जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:17 IST2025-07-12T13:14:10+5:302025-07-12T13:17:57+5:30
BJP Keshav Upadhye News: जनसुरक्षा विधेयकाला ठाकरे गट, काँग्रेसने विरोध दर्शवला असून, भाजपा नेत्यांनी टीका केली आहे.

जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
BJP Keshav Upadhye News: डाव्या कडव्या विचारांच्या नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विधानपरिषदेत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विरोध करत सभात्याग केला. अखेर, विरोधकांच्या अनुपस्थित सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक बहुमताने मंजूर केले. विधान परिषदेत ठाकरे गटासह काँग्रेसने जनसुरक्षा विधेयकाला केलेल्या विरोधानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून भाजपाने ठाकरे गटावर टीका केली आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकामध्ये बेकायदा कृत्य याची व्याख्या स्पष्ट नाही. शेंडा बुडका नसलेल्या विधेयकात नक्षलवाद असा कुठेही उल्लेख नाही. नक्षलवाद संपत आला असे सरकार सांगते आहे. मग हा जनसुरक्षा कायदा कोणासाठी आहे? पूर्वी मिसा, टाडा कायदा होता. तसाच हा कायदा आणला आहे. त्यामुळे याचे नाव भाजप सुरक्षा विधेयक ठेवा, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात केली. राजकीय हेतूने हे विधेयक आणले आहे, यामुळे कुणालाही कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते, असेही ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
चोराच्या उलट्या बोम्बा. आता जनसुरक्षा कायदाबाबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आक्षेप घेत आहेत. खरेतर आक्षेप घेण्यापूर्वी किमान त्यांच्या पक्षाच्या अंबादास दानवे, भास्कर जाधव तसेच महाविकास आघाडीतील नाना पटोले, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याशी तरी चर्चा करायची तसदी घ्यायची की या लोकांनाही काहीच कळत नाही असे ठाकरे-राऊत यांना वाटते? या विधेयकावर संयुक्त समितीत चर्चा झाली त्यात ही सर्व मंडळी होती. तिथेच या विधेयकाचा मसुदा अंतिम झाला…बर महाविकास आघाडीच्या लोकांनी आक्षेप घेणारी नोट सुद्धा त्यावेळी दिली नाही. राहता राहिला प्रश्न ६४ संघटनाची यादी. ही यादी युपीए सरकार असताना २०१२ मध्ये संसदेच्या पटलावर ठेवली होती. राऊत हे खासदार आहेत त्यांनी ती पाहावी. नसेल तर त्यांनी नक्की पाठवून द्यायला तयार आहे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, अभिजित वंजारी यांनी विरोध करून यात सुस्पष्टता आणण्याची मागणी केली. अनिल परब यांनी दहशतवाद, नक्षलवाद आणि इतर देशविघातक शक्तींना आळा घालण्यासाठी देशात यूएपीए, एमपीडीएसह चार कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरज काय? असा सवाल केला.
चोराच्या उलट्या बोम्बा…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 12, 2025
आता #जनसुरक्षा_कायदा बाबत @uddhavthackeray@rautsanjay61 हे आक्षेप घेत आहेत.
खरतर आक्षेप घेण्यापूर्वी किमान त्यांच्या पक्षाच्या अंबादास दानवे, भास्कर जाधव तसेच महाविकास आघाडीतील नाना पटोले, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्याशी तरी चर्चा करायची तसदी…