पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:10 IST2025-11-18T13:08:51+5:302025-11-18T13:10:40+5:30
या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका असं आवाहन काशिनाथ चौधरी यांनी केले आहे.

पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
डहाणू - पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते, ते काशिनाथ चौधरी यांनी २ दिवसांपूर्वी भाजपात पक्षप्रवेश केला. चौधरी यांच्या पक्ष प्रवेशानंतर पालघर साधू हत्याकांड पुन्हा चर्चेत आले. या घटनेवरून विरोधकांसह हिंदुत्ववादी संघटनांकडूनही भाजपाला टार्गेट करण्यात आले. त्यानंतर भाजपाने यू टर्न घेत २४ तासांत काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती देत असल्याचं कळवले आहे. मात्र या घटनेवरून काशिनाथ चौधरी यांनी त्यांची बाजू पत्रकारांसमोर मांडली. त्यावेळी चौधरी यांना अश्रू अनावर झाले.
काशिनाथ चौधरी म्हणाले की, २ दिवसांपूर्वी मी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर ५ वर्षापूर्वी घडलेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडांचे प्रकरण उकरून काढले गेले. ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा पोलिसांसोबत मदतीला मी तिथे गेलो होतो. मात्र या घटनेशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो. या घटनेशी माझा कुठेही संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यात कुठेही माझे आरोपी म्हणून नाव नाही. एवढे असताना माझ्यावर या घटनेचा आरोपी म्हणून आरोप होतायेत हे माझ्यासाठी अतिशय वेदनादायी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला याच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. माझी २ मुले आहेत. माझ्या मुलाला त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे, खूनी आहे असं बोलले जाते. त्याच्याशी कुणी बोलायला तयार नाही. आज त्याचा पेपर आहे तो पेपरलाही जायच्या मानसिकतेत नाही. आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी माझ्या कुटुंबातला पहिला राजकारणी आहे. माझ्या कुटुंबातील कुणीही साधी ग्रामपंचायत लढली नाही. तळागाळात कार्यकर्त्यांसोबत काम करतोय. माझं राजकीय करियर उध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत ते थांबवावे. माझ्यावर हे आरोप होतायेत त्यामुळे मी व्यथित आहे, माझे कुटुंब व्यथित आहे असं सांगताना काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका. माझं अजून भाजपाच्या वरिष्ठांशी बोलणं झाले नाही. मी कुणाशीही बोललो नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आहे. ज्या घटनेचा मी साक्षीदार आहेत, निष्पाप साधूंना वाचवण्यासाठी मी पोलिसांसोबत तिथे गेलो. परंतु मला त्यात आरोपी बनवण्याचं काम सोशल मीडियातून केले गेले. त्याबाबत मी खुलासा करण्यासाठी माध्यमांसमोर आलो. या देशातील कुठल्याही चौकशी यंत्रणेला सामोरे जायला मी तयार आहे असं आवाहनही काशिनाथ चौधरी यांनी केले आहे.