"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 19:42 IST2025-11-18T19:40:54+5:302025-11-18T19:42:15+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यात पक्षांतराचे वारे वाहत असून, महायुतीतील पक्षांमध्येच फोडाफोडी जोरात सुरू आहे. भाजपने शिंदेंच्या ठाण्यासह अनेक ठिकाणी शिवसेनेचे नेते गळाला लावल्याने शिवसेनेमध्ये धुसफूस वाढली आहे.

"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाण्यातच भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला झटके दिले. अनेक नेते आणि माजी नगरसेवक भाजपत दाखल झाले. असेच इतर काही जिल्ह्यातही झाले. त्यामुळे हा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात गेला. पण, शिंदेंच्या नेत्यांना भाजपबद्दलची खदखद अनावर होत असल्याचे दिसत आहे. शिंदेंचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपचे वागणे हे किळसवाणं आणि एखाद्या अबलेवर बलात्कार करण्यासारखं असल्याची सडकून टीका केली.
महाराष्ट्राची परंपरा उद्ध्वस्त झालेली दिसेल -शहाजी बापू पाटील
"हिडीस, किळसवाणं, दहशतवाद, एखाद्या अबलेवर बलात्कार असावा, अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचे वागणे, मला दिसून आलेले आहे. अशी जर राजकारण महाराष्ट्रात होणार असेल, तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत. त्या थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील", अशा शब्दात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर टीका केली.
भाजप वामन झालाय आणि मित्रपक्ष बळीराजा -बच्चू कडू
याच मुद्द्यावर बच्चू कडू म्हणाले की, "भाजपचा अजेंडा सोबत घेऊन घात करण्याचाच आहे. आतापर्यंत भाजपने मित्रपक्ष तयार केले, त्या सगळ्या मित्रपक्षाने संपवूनच भाजप त्याच्या डोक्यावरच... म्हणजे जसा वामन अवतार आहे ना आणि बळी राजा. भाजप इथे वामन आहे आणि बळीराजा म्हणजे त्याचा मित्रपक्ष आहे. त्याच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि आपला अजेंडा चालवायचा. हा भाजपचा उपक्रम राहिलेला आहे."
बच्चू कडूच जनतेच्या डोक्यावर बसलेले; भाजपचा पलटवार
बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेला भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिले. बन म्हणाले, "भाजप मित्र पक्षाच्या डोक्यावर बसत नाही, तर मित्रपक्षाच्या सोबत राहून, त्याला हाताशी धरून काम करण्याचा प्रयत्न करते. बच्चू कडू हे गेल्या पाच वर्षात जनतेच्या डोक्यावर बसले होते. म्हणून जनतेने बच्चू कडूंचा अचलपूरमध्ये पराभव केला. बच्चू कडूंना डोक्यावरून उतरवण्याचे काम अचलपूरच्या जनतेने केलेले आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी भाजपवर टीका करू नये."
"बच्चू कडूंनी सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बच्चू कडूंनी भाजपवर टीका करण्याआधी आत्मपरिक्षण करावं की एकनाथ शिंदेंची साथ का सोडली", असा घणाघात नवनाथ बन यांनी केला.