"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:58 IST2025-03-05T14:52:16+5:302025-03-05T14:58:28+5:30
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंबाबत मोठा दावा केला आहे.

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..."
Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तसेच आता मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा दावा केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपचीच मागणी असल्याचे म्हटलं आहे.
"जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर येतोय तेव्हा त्यांनी त्यांना राजीनाम्यासंदर्भात समजवलं. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, त्यांनी आधी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. यात मुख्यमंत्र्यांनी आधीच निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट होत आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावेळी आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ही भाजपची सुद्धा मागणी असल्याचे आव्हाड म्हणाले. "धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही सगळ्यांचीच मागणी आहे. कारण ज्यातून हे प्रकरण सुरु झालं ते खंडणीचे प्रकरण होतं. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपची मागणी आहे. या मागणीसाठी भाजपला आमचे समर्थन आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
'कृष्णा आंधळेची हत्या झालीये'
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची हत्या झाल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.