उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:17 IST2023-06-09T11:16:34+5:302023-06-09T11:17:22+5:30

महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते त्यावर भाजपाने पलटवार केला आहे.

BJP Chief Spokesperson Keshav Upadhye Targets Uddhav Thackeray-Sanjay Raut | उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही ‘लव्ह जिहाद’ची बळी; भाजपाचा खोचक टोला

मुंबई - महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे आणि या लव्ह जिहादला उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना स्वत:हून पडलेली बळी आहे अशा शब्दात प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टोला लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपावर होत असलेल्या टीकेवर उपाध्ये यांनी पलटवार केला आहे. 

मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरफटत जाणे यालाच लव्ह जिहादचा बळी म्हणतात. त्यामुळेच संजय राऊत आणि शिल्लक सेनेतील नेत्यांना सगळीकडे भगव्याऐवजी हिरवं हिरवं छान वाटायला लागले आहे. शिल्लक सेना स्वतःचं किती अधःपतन करुन घेणार आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

त्याचसोबत तुम्ही ज्यांच्यासोबत बसलाय, अबु आझमी जे महाविकास आघाडीत आहेत. त्यांना औरंग्या प्रिय होता त्यांच्याबद्दल तुम्ही अवाक्षर काढत नाही. त्याऐवजी संजय राऊत महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारवर टीका करत आहात. त्यामुळे लव्ह जिहादचा बळी तुम्हीच आहात अशी टीका केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर केली आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत?
औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजप-मिंधे सरकारच्या मुडद्यात जान फुंकली जाणार नाही. महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व धोक्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठीच औरंगजेबाचा मुडदा उकरला जात आहे. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल असं राऊतांनी म्हटलं होते. 

Web Title: BJP Chief Spokesperson Keshav Upadhye Targets Uddhav Thackeray-Sanjay Raut