मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. याच मुलाखतीत ठाकरेंनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत निवडणुकीच्या मतदानावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावरून भाजपाने पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत विरोधाभासाने भरली असून त्यात काही कबुलीची वक्तव्ये आवडली असं सांगत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टोला लगावला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आज जी मुलाखत दिली त्यात टीका-टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती. विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात. निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, असे आपण म्हटले आहे. संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासाने भरलेली आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच "मी कोणी नाही. मी शुन्य आहे, उद्धव ठाकरे याला अर्थ नाही" ही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला. उद्धव ठाकरेंनी असेच बोलत राहावे. आपोआप पितळ उघड पडेल असा खोचक टोलाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनेचे अस्तित्व शाह कधी संपवू शकत नाहीत. इतकी वर्ष होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. निवडणूक आयोग कदाचित आमचे निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो परंतु शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही. त्यांना तो अधिकारच नाही. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्याशिवाय लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली, आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. त्यावेळी तू तू मै मै झाले. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.