Maharashtra Politics: “पेंग्विन आणल्याने विकास होतो का?”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 16:45 IST2022-09-20T16:45:01+5:302022-09-20T16:45:11+5:30
Maharashtra News: राज्याचा विकास नव्याने सुरु असून, विरोधक बावचळलेल्या स्थितीत असल्याचा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Maharashtra Politics: “पेंग्विन आणल्याने विकास होतो का?”; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना रोकडा सवाल
Maharashtra Politics: भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून ८ चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आले. मात्र, यानंतर देशासह राज्यातील विरोधक सत्ताधाऱ्यांवर यावरून टीकास्त्र सोडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल करत निशाणा साधला होता. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिप्रश्न केला आहे.
अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना, बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात. महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचे काय होणार ते सांगा? अशी विचारणा करत शिंदे-भाजप सरकारवर टीका केली. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पेंग्विन आणल्याने विकास होतो का?
पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का? मुंबई, महाराष्ट्राची काय स्थिती आहे? राज्याचा विकास नव्याने सुरु आहे. राज्यात आताच नवे सरकार आले आहे. त्यांना जरा स्थिर होऊ द्या, असे सांगत सध्या विरोधक बावचळलेल्या स्थितीत आहेत, म्हणून असे आरोप करत आहेत, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विनसाठी लागलेल्या खर्चावरून भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे. चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणे ही क्रूरता असल्याचे त्यांनी म्हटले. चित्त्यांना जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा इतर प्राणी संग्रहालयात जो आहार दिला जातो, तसे द्यायला पाहिजे. पण त्याऐवजी भारतीय काळवीट जिवंतपणे चित्त्यांसमोर खायला ठेवता, हे चुकीचे असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.