शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; भाजपाची सूचक, सावध प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:05 IST2025-01-02T13:05:43+5:302025-01-02T13:05:51+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; भाजपाची सूचक, सावध प्रतिक्रिया
BJP Chandrashekhar Bawankule News: नववर्षाच्या सुरुवातीला राज्यासह देशातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी आराध्य देवतेच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशी दोन्ही हात जोडत प्रार्थना केली. तसेच सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, असे साकडे विठ्ठलाचरणी घातले, असे आशाताई पवार यांनी सांगितले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा वाढत गेल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे निवडून आल्या. विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या पक्षाने, त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे
चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचे काही कारण नाही. त्या पक्षाने, त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, संपूर्ण देशात पवार कुटुंबाचे वलय खूप मोठे आहे. त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, शरद पवारांनी गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी, समाजासाठी इतकी वर्ष काम करत आहेत. अजित पवार किती कामाचे आहेत, ते फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश मान्य करतो. शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले होते.