भाजप परत ॲक्शन मोडमध्ये, १२ जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशन, शाह, नड्डा राहणार उपस्थित
By योगेश पांडे | Updated: December 21, 2024 22:28 IST2024-12-21T22:27:31+5:302024-12-21T22:28:04+5:30
BJP News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

भाजप परत ॲक्शन मोडमध्ये, १२ जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशन, शाह, नड्डा राहणार उपस्थित
- योगेश पांडे
नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
शनिवारपासून भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाली. विधानसभा निवडणूकीअगोदर पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधून विधानसभेचे रणशिंग फुंकण्यात आले होते. आता शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा शंखनाद होईल. या महाअधिवेशनाला १५ हजारांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तालुका महामंत्रीदेखील या महाअधिवेशनाला बोलविण्यात येतील. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीतच पक्षाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. भाजपकडून १५ दिवस संघटन पर्व आयोजित करण्यात आले असून सदस्य नोंदणीवर भर देण्यात येईल. खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले टार्गेट पूर्ण झाले की नाही याचा आढावा घेण्याची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.