“...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू”; भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:49 IST2025-02-06T21:46:58+5:302025-02-06T21:49:21+5:30
BJP Minister Atul Save News: कोणतीही निवडणूक असली तरी तयारी करावी लागते. विधानसभेत भाजपाने ताकद दाखवली आहे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

“...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू”; भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान, चर्चांना उधाण
BJP Minister Atul Save News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून, मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्रपणे लढणार नसल्याचे संकेत त्यांच्याच नेत्यांच्या विधानांवरून मिळत आहे. ठाकरे गटाने तर स्वबळाच्या दिशेने तयारीही केली आहे. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपाच्या एका मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईसह अनेक महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत ठाकरे गटाने आधीच सूतोवाच केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही वेळ पडल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याबाबत तयारी सुरू केली आहे. परंतु, दुसरीकडे महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपानेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती सरकारमधील दुग्ध विकास व पारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.
...तर महापालिका निवडणुका स्वबळावर लढू
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कोणतीही निवडणूक असली तरी तयारी करावी लागते. २५ फेब्रुवारीला जर न्यायालयाचा निकाल आला तर त्यानंतर २ महिन्यांनी निवडणुका होतील. त्यामुळे त्याची तयारी आता करायला हवी. भाजपाची ताकद आहे. विधानसभेत भाजपाने ताकद दाखवली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचे एकमत नाही झाले तर आम्ही स्वबळावर लढू, असे अतुल सावे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, अतुल सावे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अतुल सावे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल भाष्य केले. भाजपाची सदस्य नोंदणी सुरू आहे. काही ठिकाणी कमी नोंदणी झाली. त्यामुळे आम्ही बैठका घेऊन त्या नोंदणीचा पाठपुरावा केला. याबद्दलचा आढावा घेतला. आढावा घेऊन पुढच्या १० दिवसात नोंदणी पूर्ण करावी. भाजपा नोंदणी झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही नोंदणी लवकरात लवकर व्हावी, असा आमचा आग्रह आहे, अशी माहिती अतुल सावे यांनी दिली.