भाजपने मागितली रामदास आठवलेंची माफी; बावनकुळे म्हणाले, "महायुतीमध्ये त्यांचे स्थान..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:43 IST2024-12-17T08:42:09+5:302024-12-17T08:43:43+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे.

भाजपने मागितली रामदास आठवलेंची माफी; बावनकुळे म्हणाले, "महायुतीमध्ये त्यांचे स्थान..."
Chandrashekhar Bawankule : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळावरुन नाराजीनाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याचे महायुतीचा भाग असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून रामदास आठवले यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच मंत्रीपद न मिळाल्याचीही खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे.
नागपूरमध्ये १५ डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा पार झाला. या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मात्र यावेळी महायुतीचा भाग असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला एकही मंत्रिपद मिळाले नाही. तसेच मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही देण्यात न आल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली. आमची मोठी चूक झाली असून त्यांना मंत्रिमंडळ शपथविधीचे निमंत्रणच दिले गेले नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले यांना महायुतीतं मोठं स्थान - चंद्रशेखर बावनकुळे
"महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम हा १४ डिसेंबर रोजी होणार होता. पण आमचे आमदार आधीच नागपूरला गेले होते. त्यामुळे शपथविधीचं स्थळ अचानक बदलले गेले. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मी सर्व पक्षांना पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, मी स्वत: जाऊन रामदास आठवले यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, ते देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांची मी माफी देखील मागितली आहे. रामदास आठवले यांचं आमच्या महायुतीतं मोठं स्थान आहे. त्यांची जी कोणती मागणी असेल त्याबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील. आम्ही त्यांचा आदर करतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काय म्हणाले होते रामदास आठवले?
"महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण आलं नाही. जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही," असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
"आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. मला वाटतं की गावागावत आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता त्यांना कसं तोंड दाखवायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे," असंही रामदास आठवले म्हणाले.