“उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याने हिंदूविरोधी भूमिका घेतली”; राज यांच्यावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:50 IST2025-03-10T13:49:30+5:302025-03-10T13:50:34+5:30
MNS Raj Thackeray News: राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होतेय. राज्यातील सूज्ञ जनतेने वारंवार भूमिका बदलणाऱ्यांना घरी बसवले. राज ठाकरेंना हिंदू अस्मितेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

“उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याने हिंदूविरोधी भूमिका घेतली”; राज यांच्यावर टीकास्त्र
MNS Raj Thackeray News: कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, आता संत-महंतांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीनेही निशाणा साधला आहे.
अलीकडेच १४४ वर्षांनंतर येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. या महाकुंभाने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली असून, याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटींनी आवर्जून सहभागी होत गंगास्नान केले. परंतु, यावरून आता राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे.
उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याने हिंदूविरोधी भूमिका घेतली
भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील जनता इतकी सुज्ञ आहे आणि तिचे कौतुक करावे तितके कमी आहे. कारण राज ठाकरे वारंवार आपल्या भूमिका बदलतात. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवले. राज ठाकरेंच्या वक्तव्यातून ते हिंदू विरोधी आहेत हे स्पष्ट झाले. त्यांची हिंदू अस्मिता आपल्या सगळ्यांना लक्षात आली. त्यांना हिंदू अस्मितेशी देणेघेणे नाही, मराठी अस्मितेशी देणेघेणे नाही. राज ठाकरे ज्या पद्धतीने खिल्ली उडवत होते, त्यातून त्यांची अस्मिता लक्षात येते. राज ठाकरे सध्या उद्धव ठाकरे यांच्या जवळ जात असल्याने त्यांनी हिंदू विरोधी भूमिका घेतली, या शब्दांत आचार्यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पुरोहित संघ, अखिल भारतीय संत समिती, आखाडा परिषद, सर्व हिंदुत्ववादी संघटना, अध्यात्मिक आघाडी या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवणार आहे की, ते ठाकरे घराण्यातील एक वंशज आहेत. त्यामुळे हिंदूंना त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. परंतु, असे बेताल वक्तव्य करून ते हिंदूंमधून त्यांची विश्वासार्हता कमी करत आहे, असे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी म्हटले आहे.