लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर आता सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करीत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली असून, या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ होते. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. महापालिका निवडणुकीच्या गदारोळात शिंदेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारली. शिंदेसेनेसोबत न जाता भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देत भाजपने अंबरनाथ विकास आघाडी हा गट नोंदणीकृत केला. या आघाडीची स्थापना ही शिंदेसेनेसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.
नवीन समीकरणाचे राजकीय अर्थ काय?
अंबरनाथच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यात नगराध्यक्षपदाच्या लढतीत भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपने पुढे केला होता. शिंदेसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध दर्शवला असून, सत्तेत त्यांचा सहभाग भाजपला नको होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांनी शिंदेसेनेकडे न जाता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नवीन आघाडीच्या वाट्याला आता स्वीकृत नगरसेवकांचीही संख्या जास्त येणार असून, सर्व समित्यांवर त्यांचे सदस्य अधिक राहतील.
शिंदेसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर युती होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती केली. - आ. डॉ. बालाजी किणीकर, शिंदेसेना.
अंबरनाथमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो असून, या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शहरासाठी आम्ही वचनबद्ध असल्यामुळेच आम्ही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे. - गुलाबराव करंजुले पाटील, प्रदेश सचिव, भाजप
शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू. - प्रदीप पाटील, गटनेते, काँग्रेस
Web Summary : In Ambernath, BJP formed an alliance with Congress and NCP, creating 'Ambernath Vikas Aghadi' to exclude Shinde's Sena from power. Claiming a commitment to corruption-free governance, this move is a setback for Shinde's faction amidst upcoming municipal elections. The alliance controls majority seats now.
Web Summary : अंबरनाथ में, बीजेपी ने कांग्रेस और एनसीपी के साथ गठबंधन करके 'अंबरनाथ विकास अघाड़ी' बनाई, ताकि शिंदे सेना को सत्ता से बाहर रखा जा सके। भ्रष्टाचार मुक्त शासन के वादे के साथ, यह कदम आगामी नगरपालिका चुनावों के बीच शिंदे गुट के लिए एक झटका है। गठबंधन का बहुमत सीटों पर नियंत्रण है।