वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:45 IST2025-10-27T12:43:13+5:302025-10-27T12:45:55+5:30
BJP Vaibhav Khedekar News: वैभव खेडेकर यांच्यासोबत केलेले पदाधिकारी पुन्हा मनसेत परतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
BJP Vaibhav Khedekar News: होय, नाही करता करता अखेरीस वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. वैभव खेडेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, परंतु, वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोन ते तीन वेळा रखडला होता. वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाला काहींचा विरोध होता, त्यामुळे तो लांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यातच आता वैभव खेडेकर यांच्यासोबत भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खेडेकर यांच्या सोबत पक्षातून बाहेर गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता पुन्हा मनसेत परतले असल्याचे म्हटले जात आहे. झालेल्या गैरसमजांना मागे टाकत हे सर्व जण राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत येत आहेत. उपजिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मोठा गट मनसेत परत आला आहे.
रत्नागिरीचा गड पुन्हा मनसेकडे
राज ठाकरेंना सोडून गेलेले पदाधिकारी पुन्हा परतल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे संघटन पुन्हा जोमाने उभे राहण्याची चिन्हे असून, रत्नागिरीचा गड पुन्हा मनसेकडे आल्याचे म्हटले जात आहे. आगामी काळात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते. खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात वैभव खेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या स्थापनेपासून वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांच्या सोबत होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते नाराज होते. वैभव खेडेकर यांचा जनसंपर्क चांगला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खेडेकर हे आता पक्षात नसल्याने मनसेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आता अनेक पदाधिकारी मनसेत परतल्यामुळे पुढे काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.