‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:56 IST2025-11-15T11:55:46+5:302025-11-15T11:56:36+5:30
Bihar Election 2025 Result: या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, असे म्हटले जात आहे.

‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. परंतु, महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे केले होते. परंतु, अजित पवार यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारमध्ये स्वबळावर १६ उमेदवार उभे केले होते, मात्र बहुतांश उमेदवारांना दखलपात्र कामगिरी करता आली नसून त्यांना आपले डिपॉझीट वाचवता आली नाही. अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशभरात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. मात्र पक्ष फुटीनंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला. हा दर्जा परत मिळावा या उद्देशाने बिहारमध्ये १६ उमेदवार उभे केले होते. परंतु, सर्वच उमेदवारांनी निराशाजनक कामगिरी केली.
१३ उमेदवार तर २०० ते ९०० मतांच्या दरम्यान
बिहारमधील महुआ, पिंप्रा आणि मनिहारी या मतदारसंघातील उमेदवारांनी किमान हजार मताचा तरी टप्पा ओलांडला आहे. बाकी १३ उमेदवार तर २०० ते ९०० मतांच्या दरम्यान आहेत. अनेक मतदारसंघात ‘नोटा’पेक्षा अल्प मतदान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आहे. बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती. या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. राष्ट्रवादीचे सर्व १६ उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बिहारमध्ये अवघी ०.०३ टक्के मते मिळाली आहेत. तर ‘नोटा’ला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक म्हणजे १.८२ टक्के मते आहेत.
दरम्यान, गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचा स्ट्राइक रेट जवळपास ८९ टक्के तर जदयूचा ८५ टक्क्यांच्या आसपास आहे. लोकसभेत ९९ जागा मिळाल्यावर काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला होता. परंतु त्यानंतर गेल्या दीड वर्षांत झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड वगळता काँग्रेसची घसरणच झाली आहे. बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊनही काँग्रेसला जेमतेम सहा जागा मिळाल्या. बिहारमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.