NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर इथं होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या यादीत आपला नंबर लागावा, यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशीरपर्यंत फिल्डिंग लावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित केली असून यामध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही. त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. तसंच जिल्ह्यातील दुसरे आमदार नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद मात्र कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
धनंजय मुंडेंचं काय होणार?
राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही नराधमांकडून क्रूर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशीही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र शेवटच्या क्षणी अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.