मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:33 IST2025-10-05T06:32:40+5:302025-10-05T06:33:03+5:30
Light Bill Hike: महावितरणने लादले इंधन समायोजन शुल्क : प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार, उद्योजकांसह, छोट्या व्यापाऱ्यांनाही झटका

मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
- कमल शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या तोंडावर महावितरणनेवीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल; सणसुदीत खरेदी-खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भारही जोडला गेला आहे.
१ ऑक्टोबर रोजी महावितरणने एक सर्क्युलर जारी करून सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे.
सूत्रांचे म्हणणे आहे की, ही दरवाढ येत्या काही महिन्यांतही सुरूच राहील. महावितरणचे म्हणणे आहे की, वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली जात आहे.
घरगुती ग्राहकांवर असा पडणार भार
श्रेणी प्रति युनिट - इंधन समायोजन शुल्क
बीपीएल १५ पैसे
१ ते १०० युनिट ३५ पैसे
१०१ ते ३०० युनिट ६५ पैसे
३०१ ते ५०० युनिट ८५ पैसे
५०१ पेक्षा जास्त ९५ पैसे
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग महागणार, शेतकऱ्यांनाही बसणार फटका
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे. त्यामुळे आता चार्जिंगसाठी प्रति युनिट ४५ पैसे अधिक द्यावे लागतील. मेट्रो व मोनोरेलसाठी ४५ पैसे प्रति युनिट अधिक द्यावे लागणार. शेतकऱ्यांनाही वीज दरात प्रति युनिट ४० पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.
उद्योजक -व्यापाऱ्यांवर दुहेरी मार : उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना या वीज दरवाढीचा दुहेरी मार सहन करावा लागणार आहे. संपलेल्या ३० सप्टेंबर रोजीच ‘कुसुम घटक ब’ साठी निधी उभारण्यासाठी राज्य सरकारकडून औद्योगिक व व्यापारी वीज दरावर ९.९० पैसे प्रति युनिट एवढा कर लावला होता. आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी प्रति युनिट ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट एवढा इंधन समायोजन शुल्क लादण्यात आला.