मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 20:28 IST2023-10-28T20:26:26+5:302023-10-28T20:28:09+5:30
या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, काय आहे प्रकरण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे त्यांना अपात्र का करू नये?, अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजाववण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीय आहे. या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ८ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. तर शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. तसेच, नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी देखील कोणतीही नोटीस बजावली नाही.
'या' आठ आमदारांना नोटीस
विधीमंडळाकडून अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला हे आठही आमदार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. खरा पक्ष कोणाचा? यावरुन दोन्ही गटात आता कायदेशीर लढाई देखील सुरु झाली आहे.