Chhagan Bhujbal Latest News: राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. छगन भुजबळ मंगळवारी सकाळी १० वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनामध्ये त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी आशा होती; पण त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळ ते नाराजही होते. त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शपथविधी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी दहा वाजता राजभवनात राज्यपाला भुजबळांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. ५० लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली.
निमंत्रितांना मंगळवारी सकाळी ९ वाजता राजभवनातील कार्यक्रमस्थळी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडेंचे खाते भुजबळांना?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे दिले जाणार असल्याची चर्चा आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला.
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खाते होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांभाळत आहेत. ते आता भुजबळांकडे सोपवण्यात येणार असे बोलले जात आहे.