मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:51 IST2025-04-18T12:48:34+5:302025-04-18T12:51:10+5:30
आरोग्य योजनांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Government: राज्याचे आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. उपचाराअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागू नयेत यासाठी अपघातग्रस्त रुग्णांना विविध योजनांमध्ये अंगीकृत असलेल्या रुग्णालयांत १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करावेत, अशा सूचनाही आबिटकर यांनी दिल्या आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या आहेत.
पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात आरोग्य व्यवस्थेबाबत संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना चाप बसवणे आणि राज्यातील जनतेला योग्य दरात आणि तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत चर्चा करण्यासाठी आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी महिन्यातून एकदा आरोग्य शिबिराचं आयोजन करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, यासाठी योग्य ती पावले उचला, असे निर्देश प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, शासकीय आरोग्य योजनांतील सुधारणांसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीने पुढील एक महिन्यात आपला अहवाल सादर करावा, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.