एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:27 IST2020-09-15T19:25:10+5:302020-09-15T19:27:00+5:30
अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू झाल्यानंतर कर्मचारी स्वतःचा जोव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे.

एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"
पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. त्यातच राज्य सरकारने अनलॉक-४ मध्ये एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसलेही संरक्षण नव्हते. पण आता एसटी महामंडळाकडून कोविड काळात कर्तव्य बजावत असताना मृत्यू आल्यास ५० लाखांचे विमा कवच देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या टाळेबंदीमुळे एसटी सलग साडेचार महिने बंदच होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून काही गाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
मात्र राज्य सरकारने एसटी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याने राज्यातील बहुसंख्य मार्गांवर आता एसटी जात आहे. चालक, वाहक त्यासाठी काम करत आहेत. एसटीची कार्यालयेही सुरू झाली आहेत. पण इतक्या दिवस जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी महामंडळाने विमा कवच जाहीर केले आहे.
आता एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबधिताला यापुढे ५० लाख रूपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी महामंडळाकडे असलेल्या अपघात मदत निधीचा वापर करण्यात येणार आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांना विम्याचे वगैरे संरक्षण नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्याची दखल घेऊन महामंडळ प्रशासनाने हे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबधित कर्मचाऱ्यांच्या निकटच्या वारसास आता ५० लाख रूपये मिळतील. त्यासाठी प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकाच्या अध्यक्षतेखाली लेखा अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी यांची एक समिती असेल. या समितीसमोर संबधित प्रकरणाची कागदपत्रे, मृताचे निकटचे कायदेशीर वारस, वगैरेची छाननी होईल. त्यानंतर निर्णय होईल. मदतीचे ५० लाख रूपये निकटचा वारस निश्चित झाल्यावर त्याच्या खात्यात जमा करण्यात येतील. महामंडळाच्या अपघात मदत निधीतून ही रक्कम घेण्यात येईल असे मुख्य कार्यालयाकडून सर्व विभाग नियंत्रकांना कळवण्यात आले आहे.