तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 15:10 IST2023-11-03T15:05:59+5:302023-11-03T15:10:40+5:30
रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक म्हणुन सतीश पाटील यांची ओळख आहे.

तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात
पनवेल : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पनवेलचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी पुन्हा अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. रायगड जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे यांचे खांदे समर्थक म्हणुन सतीश पाटील यांची ओळख आहे.
पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेतृत्व केल्यानंतर मध्यवती राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट तयार झाले.तटकरे यांच्या नावाने सतीश पाटील यांच्या शिक्षण संस्था आहेत.तटकरे समर्थक असल्याने सतीश पाटील यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला मात्र अजित पवार गटातही दोन गट पडले.या गटामार्फत जिल्ह्याध्यक्ष पद भूषविलेल्या सतीश पाटील यांना डावलण्यात आले.
पक्षाच्या बॅनरवरून देखील सतीश पाटील यांचा फोटो डावलण्यात येत असल्याने त्यांची घुसमट होत होती.या गटबाजीबाबत खासदार सुनील तटकरे यांना कल्पना देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याने अखेर सतीश पाटील यांनी दि.2 रोजी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.यावेळी पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील,भावना घाणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.