महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:58 IST2025-12-19T10:57:39+5:302025-12-19T10:58:49+5:30
Maharashtra Election 2026: पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
रायगड - राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात इच्छुक उमेदवारांच्या फोडाफोडीपासून पक्षप्रवेशापर्यंत सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेनेत चढाओढ सुरू आहे. मात्र रायगड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी उरण विधानसभा जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवून विनोद साबळे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामुळे उरण येथे शिंदेसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
अतुल भगत यांना पदावरून हटवल्याने उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकरे, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह जवळपास ३३ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाच्या सचिवांकडे पाठवले आहेत. नुकतीच उरण येथे नगर परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीत न लढाता भाजपा आणि शिंदेसेना वेगवेगळी मैदानात उतरली होती. यावेळी प्रचारात दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र याच निवडणुकीमुळे शिंदेसेनेतील पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आले. पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना नियुक्ती केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
त्याशिवाय आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानी आणि एकाधिकारशाही केल्याचा आरोप राजीनामा दिलेले पदाधिकारी करत आहेत. थोरवे यांनी विनोद साबळे यांची उरण मतदारसंघाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामुळे इथल्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांची बाजू न ऐकता परस्पर नियुक्ती करण्याच आली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना बाहेर आणि बाहेरच्यांना संधी असा नाराजीचा सूर पदाधिकाऱ्यांमध्ये उमटत आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नाराजीनाट्य उफाळून आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. पक्षवाढीसाठी मेहनत घेणारे जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी विविध जिल्ह्यांमधील इतर पक्षीय नेत्यांचा शिंदेसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. मात्र दुसरीकडे पक्षातील पदाधिकारी नाराज होत राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.