भुजबळांची आणखी 20 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबई, पुणे, नाशिकात छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:59 IST2017-12-05T21:58:16+5:302017-12-05T21:59:40+5:30
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या दीड वर्षापासून कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

भुजबळांची आणखी 20 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबई, पुणे, नाशिकात छापे
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणी गेल्या दीड वर्षापासून कारागृहात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) भुजबळ कुटुंबीयांची मंगळवारी २०.४१ कोटीची मालमत्ता जप्त केली. मुंबई, पुणे व नाशिक या ठिकाणच्या पाच आलिशान बंगले, फ्लॅट, कार्यालये व भूखंडाचा त्यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
छगन भुजबळ यांची येत्या काही दिवसांमध्ये जामिनावर सुटका होण्याची शक्यता वर्तविली जात असताना ईडीने केलेल्या कारवाईमुळे पुन्हा धक्का बसला आहे. आतापर्यंत त्यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार पंकज व पुतणे समीर भुजबळ यांच्या मालकीची 178 कोटी किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. मंगळवारी मुंबई, पुणे व नाशिक येथील बंगला, फ्लॅट, कार्यालय व भूखंड जप्त केले.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन भवनाच्या बांधकामात मोठा अपहार केला. त्याचप्रमाणे बनावट कंपन्याची स्थापना करून शेकडो कोट्यवधीचा बेनामी मालमत्ता वर्ग केल्याचे ईडी गुन्हा दाखल केला असून, भुजबळ कुटुंबीयासह एकूण 52 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भुजबळ यांना गेल्या वर्षी 14 मार्चला अटक करण्यात आली असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आॅर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.