भुजबळ फाउंडेशनचे खाते चौकशीच्या घेऱ्यात

By Admin | Updated: June 11, 2015 02:59 IST2015-06-11T02:59:57+5:302015-06-11T02:59:57+5:30

छगन भुजबळ सामाजिक कल्याण संस्थेचे खाते सारस्वत बँकेत असून, या खात्यावरील व्यवहाराची चौकशी आता भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून ( एसीबी) केली जाणार आहे

Bhujbal Foundation's account inquiries | भुजबळ फाउंडेशनचे खाते चौकशीच्या घेऱ्यात

भुजबळ फाउंडेशनचे खाते चौकशीच्या घेऱ्यात

डिप्पी वांकाणी, मुंबई
छगन भुजबळ सामाजिक कल्याण संस्थेचे खाते सारस्वत बँकेत असून, या खात्यावरील व्यवहाराची चौकशी आता भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून ( एसीबी) केली जाणार आहे. एसीबीने छगन भुजबळ व इतर पाच जणांच्या विरोधात कलिना लायब्ररी प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. सारस्वत बँकेच्या खात्याचे फेब्रुवारी २०१० ते आॅक्टोबर २०११ या कालावधीतील स्टेटमेंट सरकारी कंत्राटे आणि ती मिळविणाऱ्या कंत्राटदारांनी भुजबळांच्या संस्थेला दिलेल्या भरघोस देणग्या याबाबत सूचक आहे. या खात्यातील व्यवहाराच्या  स्टेटमेंटची प्रतच ‘लोकमत’च्या हाती आली आहे.
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी विविध बांधकाम कंपन्यांना दिलेली कंत्राटे व त्यापोटी मिळालेली लाच संस्थेच्या खात्यात जमा केलेला लेखाजोखा या स्टेटमेंटवरून स्पष्ट होत आहे. २०१०-११ च्या दरम्यान छगन भुजबळ यांनी नाशिक महोत्सवाचे आयोजन केले व त्यात सहभागी झालेली इव्हेंट कंपनी व बॉलीवूड कलाकारांना याच खात्यातून पैसे देण्यात आले.
त्या संदर्भात बॉलीवूड कलाकार लारा दत्ता, सोनू निगम, नेहा धुपिया यांचीही नावे या खात्यावर दिसत आहेत. शिवाय सेलिना जेटली ४.५ लाख, साधना ३.६ लाख, दिनो मोरिया ४.५ लाख, लारा दत्ता १६.२० लाख असेही या खात्यातून वाटप झाले आहे. इतर कलाकारांत अभिजित सावंत (गायक) याला ४५ हजार, नेहा धुपिया ४.९ लाख, सोनू निगम लाख रुपये देण्यात आले.
सारस्वत बँकेतील या खात्याचा क्रमांक सीएपीयूबी १६५५ असून, हे खाते नाशिक येथील आहे. २ फेब्रुवारी २०१० रोजी हे खाते फक्त ५ हजार रुपये भरून सुरू करण्यात आले. पण फक्त १० दिवसांत या खात्यावर अशोका बिल्डकॉमकडून २५ लाख रुपये जमा झाले. अशोका बिल्डकॉम व एल अँड टी यांना मुंबई - नाशिक टोल रोड बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते. एल अँड टीने भुजबळ यांच्या संस्थेला १० लाख वेगळे दिले.
इंडिया बुल्स रियल्टीला कलिना विद्यापीठात वाचनालय बांधण्याचे काम देण्यात आले. त्यांनी ९८ लाख व १ कोटी ४७ लाख रुपये दिले.
विविध कंत्राटे मिळालेल्या इतर कंपन्यांत पेनिन्सुला लँड लि.ने २४.७५ लाख दिले. तर पवार पाटकर कन्स्ट्रक्शन्सने दोन टप्प्यांत १० व ५ लाख दिले. या कालावधीत स्वत: काढलेली रक्कम ७०.५ लाख रुपयांची आहे.
हे खाते २ फेब्रुवारी २०१० रोजी ५ हजार रुपये भरून सुरू झाले. त्यावरील सर्वाधिक रक्कम २४ फेब्रुवारी रोजी २ कोटी ५२ लाख ७९ हजार ९१६ रुपये होती. २४ आॅक्टोबर २०११ रोजी हे खाते बंद करण्यात आले, त्या वेळी त्यात फक्त २.१२ लाख रुपये होते.

Web Title: Bhujbal Foundation's account inquiries