Bharat Kesari Dadu Chougale passes away | महान कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे निधन
महान कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे निधन

कोल्हापूर : महान कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे आज दुपारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. तीन दिवसापूर्वी त्यांना धाप लागल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते .उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. न्यूझीलंड आॅकलंड  येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले होते.

देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान दादू चौगुले हे कुस्तीच्या आखाड्यातले मानाचे नाव. लाल मातीतून बाहेर पडल्यानंतर कुस्तीशी नाळ कायम ठेवत बदलत्या प्रवाहानुसार कुस्तीच्या विकासासाठी झटणारे रुस्तुम ए हिंद, महान भारत केसरी, राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुलें यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

मुलाला पैलवानच करायचं, या हट्टानं प्रसंगी पोटाला चिमटा घेत आई-वडिलांनी दादूला खुराक दिला. वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावातील हा धट्टाकट्टा मुलगा आखाड्यात उतरला. छोट्या छोट्या कुस्त्या मारणारा हा मुलगा वस्ताद गणपतराव आंदळकरांच्या मनात भरला. त्यांनी मोठी मेहनत करून घेत कुस्तीचे डावपेच शिकवले. पुढे हा पट्टा महाराष्ट्रात चमकला आणि बघता बघता सत्पालसह उत्तरेतील बुरुजबंद मल्लांशी भिडू लागला. मिळालेल्या संधीचे सोने करताना अनेक मानाच्या गदा त्याने पटकावल्या. पैलवान आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या या पैलवानाने कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला.

दादू चौगुलेंनी लाल मातीबरोबर मॅटवरही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवला. १९७३ साली न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या शंभर किलो गटातील कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तत्पूर्वी त्यांनी महान भारत केसरी, रूस्तम ए हिंद या मानाच्या गदा कोल्हापुरात आणल्या होत्या. त्यामुळे त्यांचा कुस्तीत चांगलाच दरारा निर्माण झाला. आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय योगदान दिले. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद हिंदकेसरी झाला.

 


Web Title: Bharat Kesari Dadu Chougale passes away
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.