मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:40 IST2026-01-12T14:39:37+5:302026-01-12T14:40:14+5:30
Space objects fallen in Maharashtra: भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावात आकाशातून आगीच्या गोळ्यासारख्या दोन वस्तू कोसळल्या. उल्कापिंड की उपग्रहाचा भाग? तपासणीसाठी कोलकात्याची रिसर्च टीम भंडाऱ्यात दाखल होणार.

मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली...
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील परसोडी गावात शनिवारी दुपारी एक थरारक आणि विस्मयकारक घटना घडली. भरदिवसा आकाशातून आगीच्या गोळ्यासारख्या दोन अज्ञात वस्तू जमिनीवर कोसळल्याने परिसरात भीतीचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही वस्तू नेमकी काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आता राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
शनिवारी दुपारी परसोडी येथील मैदानावर काही मुले खेळत होती. त्याच वेळी त्यांना आकाशातून दोन चमकणारे 'आगीचे निखारे' वेगाने जमिनीच्या दिशेने येताना दिसले. मुलांनी तातडीने ही माहिती आपल्या पालकांना दिली. पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि त्वरित जवाहरनगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दोन्ही अज्ञात अवशेष ताब्यात घेतले असून सध्या ते पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
उल्कापिंड की सॅटेलाइटचा कचरा?
प्राथमिक अंदाजानुसार, हे अवशेष एखादा उल्कापिंड किंवा अंतराळातील उपग्रहाचे भाग असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.
कोलकात्याची टीम करणार तपास
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवशेषांचे गूढ उकलण्यासाठी उद्या, मंगळवारी कोलकाता येथील एका विशेष रिसर्च टीमसह तज्ज्ञ भंडाऱ्यात दाखल होणार आहेत. ही टीम वैज्ञानिक पद्धतीने या पदार्थांचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेत तपासणी करेल, त्यानंतरच हे आगीचे गोळे नेमके काय होते, हे स्पष्ट होईल.