'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 05:38 IST2025-02-03T05:37:20+5:302025-02-03T05:38:39+5:30
देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले.

'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट
बीड/अहिल्यानगर : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची रविवारी भेट घेतली. सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली धनंजय देशमुख यांनी महंत शास्त्री यांच्यासमोर मांडली. त्यानंतर देशमुख कुटुंबीय हे भगवानबाबांना मानणारे असून, जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे भगवानगड सदैव राहील, अशी ग्वाही महंत शास्त्री यांनी दिली.
देशमुख कुटुंबीय व महंत नामदेव शास्त्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी देशमुख कुटुंबीय आणि वंजारी समाजाचे सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे धनंजय देशमुख यांनी पुराव्यानिशी पटवून दिले. २२ वर्षांपासून आपली शेती वंजारी समाजातील मुंडे कुटुंबीय करीत असल्याचेही त्यांनी महंत शास्त्री यांच्या निदर्शनास आणून दिले.
बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला
मी जे शब्द बोललो, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींची तशी मानसिकता का झाली असावी? कारण ॲक्शनची रिॲक्शन होण्यापूर्वी घटना टाळता आली असती, असे मला म्हणायचे होते. परंतु या वाक्याचा विपर्यास करण्यात आला, असे नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
आरोपींची कुंडली मांडली..!
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे हे पटवून देण्यासाठी धनंजय देशमुख यांनी या सर्व आरोपींवर कोणत्या स्वरूपाचे किती गुन्हे आहेत याची कुंडलीच पुराव्यानिशी मांडली. हे पाहून नामदेव शास्त्रीही अवाक् झाले होते.
देशमुख कुटुंबीय जातीवादी नाहीत..
तीन वेळा मस्साजोग येथील सरपंचपद हे संतोष देशमुख यांच्याकडे राहिले असले तरी त्यांनी कधीही ध्वजारोहण केलेले नाही, देशमुख कुटुंब हे जातीयवादी नाही. यातूनच या ग्रामपंचायतीला आजपर्यंत १९ पुरस्कार मिळाल्याची माहिती महंत नामदेव शास्त्री यांना दिल्याचे धनंजय देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वैभवी म्हणाली, ‘आम्हाला न्याय द्या’
सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व भाऊ धनंजय देशमुख यांनी तुम्ही एक बाजू ऐकून बोलला आहात, दुसरी बाजूही तुम्हाला समजावी यासाठीच आम्ही आपल्या भेटीला आल्याचे सांगून आम्हाला न्याय द्या, अशी भावना व्यक्त केली.