Ajit Pawar on Koshyari Controversial statement : "अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी..."; अजित पवारांचे कोश्यारी यांच्या विधानावर सडेतोड वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:00 IST2022-07-30T14:59:21+5:302022-07-30T15:00:41+5:30
राज्यपाल कोश्यारींच्या विधानामुळे नवा वाद

Ajit Pawar on Koshyari Controversial statement : "अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी..."; अजित पवारांचे कोश्यारी यांच्या विधानावर सडेतोड वक्तव्य
Ajit Pawar Reaction on Bhagat Singh Koshyari Controversial statement: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यातील कारकीर्द सुरूवातीपासूनच वादग्रस्त स्वरूपाची आहे. सुरूवातीला राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतभेदाच्या बातम्या चांगल्याच गाजल्या. त्यानंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपालांनी (Governor of Maharashtra) सरकारबाबत विधान न करता मुंबई, ठाण्याबाबत विधान करत वाद ओढवून घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यासारख्या भागांमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळं केल्यास या शहरांकडे पैसेच राहणार नाही आणि मग मुंबईला आर्थिक राजधानीही म्हणता येणार नाही, अशा आशयाचं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली.
अजित पवार हे नेहमीच आपल्या रोखठोक आणि सडेतोड उत्तरांसाठी ओळखले जातात. त्यामुळे अजितदादा यावर काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होतो. अजित पवार यांनी दोन ट्वीट करून कोश्यारी यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे, असं ठणकावून सांगितले. "मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे... खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।", असे ट्वीट करत अजितदादांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली.
।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे... खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2022
राज्यपालांचा 'त्या' विधानावर खुलासा
“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असे विधान राज्यपाल कोश्यारींनी केल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. त्यावर त्यांनी खुलासा केला. "मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही", असा खुलासा राज्यपालांनी केला.