सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: June 6, 2025 19:39 IST2025-06-06T19:36:30+5:302025-06-06T19:39:24+5:30
महाराष्ट्रात बनावट दारुची विक्री केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

सावधान! महाराष्ट्रात विकली जातेय बनावट दारू, २० लाखांचे मद्य जप्त, चौघांना अटक
जितेंद्र कालेकर, ठाणे: गोवा निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याची छुप्या मार्गाने मुंबई ठाण्यात चढ्या दराने विक्री करणाऱ्या श्रीकांत ताेकडे (२७, रा. टिटवाळा, ठाणे), वकील मंडल ( २३, रा. नांदीवली, कल्याण, ठाणे), रवी तिवारी (३०, रा.डोंबिवली, ठाणे) आणि संजीत यादव (१९, रा.डोंबिवली, ठाणे) या चौघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून २० लाखांच्या मद्यासह वाहनही जप्त केले आहे.
आरोपींना ९ जूनपर्यंत पेालीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. काहीजण गोवा निर्मित, कमी गुणवत्तेचे बनावट विदेशी मद्याच्या बॉटल्स छुप्या मार्गाने बेकायदेशीररित्या डोंबिवलीतील सुदामवाडी भागात आणून त्या बॉटल्सवरील गोव्याचे लेबल आणि किंमतीचे लेबल काढून त्यावर हुबेहूब बनावट लेबल तयार करुन त्याची महाराष्ट्रातील वेगवेगळया शहरांमध्ये विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पेालीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सुदामवाडी भागात सापळा लावून रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एका वाहनाला ताब्यात घेतले. याच तपासणीमध्ये हा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
वाहनाचा चालक श्रीकांत तोकडे याच्या चौकशीमध्ये त्याच्याकडे मद्याच्या साठयाबाबतची कोणतीही कागदपत्रे आढळली नाही. डोंबिवलीतील सुदामवाडीतून एका घरातून हा साठा आणल्याची माहिती दिली. त्याच आधारे ४ जून आणि ५ जून अशा दोन दिवसांच्या कारवाईत वेगवेगळया ब्रॅन्डच्या १८ हजार २९० बॉटलमधील साठा जप्त करण्यात आला. मद्याच्या बॉलवर बनावट बॅच नंबर, निर्मितीची तारीख आणि मुदत संपल्याची तारीखेचा छाप उमटविण्यासाठीची वापरण्यात येणारे प्रिन्टर मशीन आणि बनावट लेबल, टेम्पोसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी डोंिबवली पाेलीस ठाण्यात दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकासह चौघांना अटक
श्रीकांत हा टेम्पोचा चालक असून मंडल हा क्लीनर आहे. तर रवी आणि संजीत यांच्या ताब्यात हा विदेशी मद्याचा साठा होता. या चौघांनाही अटक केली आहे