"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची गावकऱ्यांना शंका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:20 IST2024-12-16T13:18:41+5:302024-12-16T13:20:14+5:30

Ambadas Danve on Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Maharashtra Winter Session 2024: आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Villagers Suspect Involvement of a Minister Close Aid Valmik Karad said Ambadas Danve in Maharashtra Winter Session 2024 | "बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची गावकऱ्यांना शंका"

"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची गावकऱ्यांना शंका"

Ambadas Danve on Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Maharashtra Winter Session 2024: गेल्या काही दिवसांपासून बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या हत्या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली असून या हत्येचा राजकीय संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तशातच आजपासून नागपुरात सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार ३ आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आज सभागृहात केली. या प्रकरणाची माहिती आज २८९ अन्वये दानवे यांनी सभागृहात मांडली.

विभागात पवनचक्कीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दाेन गटांत वाद झाला. यात मस्साजोगच्या सरपंचाने मध्यस्थी केली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. याच मारहाणीचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यात आला. याचाच राग आरोपींच्या मनात होता. हे सर्व सरपंचाने केल्याच्या गैरसमजुतीतून सहा जणांनी अपहरण करून वायरने गळा आवळून सरपंच संतोष देशमुख यांचा खून केल्याची माहिती आहे. आमचा अपमान झाल्याने रागाच्या भरात आम्ही हे कृत्य केल्याचे आरोपींनी सांगितले असल्याचीही माहिती आहे. याच हत्या प्रकरणाबाबत आज दानवे सभागृहात बोलले. "घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याची येथील गावकऱ्यांना शंका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा," अशी मागणी दानवे यांनी केली. 

तर आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांना एक पत्र दिले. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कोणत्याही प्रकरणात अशासकीय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस यंत्रणा हातचे बाहूले बनून काम करत आहेत. परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटात सोडून दिले. मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मॅसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही. नंतर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे समजले. पोलीस अधिक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. यामुळे पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे, असे बजरंग सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

Web Title: Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Villagers Suspect Involvement of a Minister Close Aid Valmik Karad said Ambadas Danve in Maharashtra Winter Session 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.