"सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं’’, स्वपक्षीय नेत्याविरोधात पंकजा मुंडे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:41 IST2025-01-11T18:39:36+5:302025-01-11T18:41:02+5:30
Pankaja Munde Criticize Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवरून आक्रमक झालेले भाजपा आमदार सुरेश धस यांना पंकजा मुंजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

"सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं’’, स्वपक्षीय नेत्याविरोधात पंकजा मुंडे आक्रमक
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवरून भाजपाचे आमदार सुरेश धस हे कमालीचे आक्रमक झालेले आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांवरून सुरेश धस हे धनंजय मुंडे आणि मुंडे कुटुंबीयांवर जोरदार टीका करत आहेत. यादरम्यान, सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही काही वेळा टीका केली आहे. आता पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणात आक्रमक झालेल्या सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिलं असून, सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, सुरेश धस यांच्यामुळे तर बीड बदनाम झालं आहे. कारण शेवटी या विषयाची ज्या पद्धीतीने राज्यभरामध्ये मांडणी झाली आहे ते पाहता राजकीय भूमिका न घेता या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहिलं असतं तर असं घडलं नसतं, असे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, खरंतर अशा अनेक घटना राज्यभरात घडत आहेत. म्हणून ही घटना निर्घृण आहे. मी तिचा तीव्र निषेध केला आहे. वेळोवेळी केला आहे. तरीही मी बोलत नाही आहे, माझी भूमिका काय, म्हणत मलाच काय सिद्ध करायला लावत आहात. मी पर्यावरणमंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे होतं. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर सुरेश धस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, फक्त परळीचेच लोक का विमा भरताहेत. सगळ्या जिल्ह्यात भरताहेत आणि संपूर्ण राज्यात भरत आहेत. मग बदनामीचं काय, आम्ही कुठे बदनाम करतो, असे सुरेश धस म्हणाले.