मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:56 IST2025-01-07T10:53:33+5:302025-01-07T10:56:33+5:30
Santosh Deshmukh Family To Meet CM Devendra Fadnavis: बीड हत्या प्रकरणात घडत असलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, याकडे राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.

मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण
Santosh Deshmukh Family To Meet CM Devendra Fadnavis: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी तसेच विशेष तपास पथकाकडून तपास सुरू आहे. एका बाजूला राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसऱ्या बाजूला मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, तर्क-वितर्क लावले जात आहेत.
संतोष देशमुख कुटुंबीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीकडे राज्याचे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस शोध घेत आहेत. मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत कशा पद्धतीने तपास झालेला आहे याची माहिती फडणवीस संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मस्साजोगमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या पत्नी, भाऊ धनंजय देशमुख तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
वाल्मीक कराड शरण आल्यानंतर अन्य आरोपींची धरपकड
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मीक कराड चौकशीसाठी सीआयडीच्या ताब्यात आहे. वाल्मीक कराड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या तिघांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस कृष्णा आंधळेचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात या संदर्भात माहिती दिली होती. तपासामध्ये कुठल्या गोष्टी समोर येत आहेत हे सांगत असतानाच या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.