बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:45 IST2025-07-03T15:40:54+5:302025-07-03T15:45:11+5:30
NCP Deputy CM Ajit Pawar News: बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होऊन दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
NCP Deputy CM Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक -३ मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाने घेतला आहे.
या निर्णयामुळे बीड जिह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविणे, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बैठका घेऊन ‘सीट्रिपलआयटी’च्या उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. ‘एमआयडीसी’च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रासंदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी या वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. त्यासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयआयटी’ स्थापन करणार आहे. कंपनीने तशा आशयाचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. या नव्या सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी २ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या बीड जिल्ह्याचा दौऱ्यात बीड जिल्ह्यातील युवकांसाठी उद्योग क्षेत्राच्या मदतीने ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने त्यांनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीला पत्र लिहून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राला ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयआयटी’ स्थापन करण्याची तयारी दर्शविली. १९१ कोटींपैकी १५ टक्के म्हणजे ३३ कोटी रुपयांचा खर्च बीड जिल्हा प्रशासन करणार असून उर्वरीत खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि त्यांच्या भागीदार कंपन्या, संस्था उचलणार आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने ‘सीआयआयआयटी’ स्थापन केल्यानंतर दरवर्षी सुमारे ७ हजार युवकांना उद्योगांच्या (४.०) गरजेनुसार आवश्यक जागतिक दर्जाचे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल तसेच युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार मिळवणे, स्वयंरोजगार करणे शक्य होणार आहे.
‘सीआयआयआयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून उचलणार आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यांची कौशल्यवृद्धी होईल. उद्योगांना त्यांच्या गरजेप्रमाणे प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.