फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 19:46 IST2023-09-27T19:45:35+5:302023-09-27T19:46:11+5:30
अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र हा आकडा गुलदस्त्यात आहे. - मिटकरी

फडणवीस असो किंवा शिंदे, अजित पवार २०२४ ला १४५ चा आकडा गाठणार, मुख्यमंत्री होणार; मिटकरींचे वक्तव्य
लालबागच्या चरणी असलेली दानपेटी उघडली गेली, त्यावेळी एका भक्ताने चिठ्ठी टाकली असावी आणि त्याची ती इच्छा पूर्ण होवो. भावनेच्या भरात मोहित कंबोज यांनी ट्विट केले असावे आणि नंतर डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. १४५ चा आकडा असल्याशिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, मग ते फडणवीस असो किंवा शिंदे किंवा अजित पवार. परंतू, २०२४ ला अजित पवारच मुख्यमंत्री होतील, असा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र हा आकडा गुलदस्त्यात आहे. नागालँडच्या आमदारांनी देखील अजित पवारांना पाठिंबा दिलाय, त्यांचे नेतृत्व सर्वांना मान्य आहे. त्यांचे नेतृत्व सर्वजण स्वीकारत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. अनेक आमदार संपर्कात आहेत आणि अनेक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. येत्या काळात सगळे चित्र स्पष्ट होईल असे मिटकरी म्हणाले.
जरांगे पाटलांनी जे उपोषण केले आणि चळवळीमध्ये जे उपोषण सुरू आहे त्यांचा तो संविधानिक लढा आहे. त्यांना महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. मराठा समाजाला आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ते मिळावे, अशी सरकारची भावना आहे, असे मिटकरी म्हणाले.
याचबरोबर आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने जो अल्टिमेटम दिलाय त्यात निकाल देणे बंधनकारक आहे. निवडणूक आयुक्त जो निर्णय देतील तो सर्वांना मान्य असेल, असे मिटकरी यांनी सांगितले.