"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:51 IST2026-04-13T11:49:52+5:302026-04-13T11:51:41+5:30
Sanjay Raut Sharad Pawar Sunetra Pawar Baramati By Elections: अजित पवार असोत, सुनेत्रा पवार असोत; तुम्ही राजकारणात 'पवार' म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळेच"

"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
Sanjay Raut Sharad Pawar Sunetra Pawar Baramati By Elections: अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी राज्याच्या राजकारणात पाऊल ठेवले. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून त्या आमदार म्हणून विधानसभेत जातील हे जवळपास निश्चित आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही, पण सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. शरद पवार यांनी स्वत: फोन केल्यावर काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. तसेच, आता सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे प्रचार करणार असल्याचेही सांगितले जात आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची विधाने केली.
शरद पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर...
खासदार संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? मोदी आणि शाह यांनी कुणालाही पदे दिली असतील, पण शरद पवार यांनी जर बारामती उभी केली नसती; तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कुठलंच स्थान मिळालं नसतं. त्यामुळे माणसाने किमान कृतज्ञता ठेवायलाच हवी. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केलात तरीही तुमच्या पाठीशी पवारांची पुण्याई आहे. ही निवडणूक अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मविआ लढवत नाहीये. पण पुढली निवडणूक बिनविरोध नसेल."
पवारांमुळे आपण आहोत हे विसरू नका!
"अजित पवार असोत, सुनेत्रा पवार असोत किंवा इतर कोणीही पवार असोत; तुम्ही कितीही मोठे झाले असाल तरीही राजकारणात 'पवार' म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे उभे आहात, याचा विसर पडता कामा नये. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव निर्माण करून दिला, त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. तसेच बारामती म्हणजे शरद पवार. सध्याची निवडणूक हा पवार कुटुंबाचा कौटुंबिक विषय आहे. पण तरीही पवारांमुळे आपण आहोत हे इतरांनी लक्षात ठेवायला हवे," असे संजय राऊतांनी सुनावले.
सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री?
"अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजपा मुख्यमंत्री करणार असतील, तर तो भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याआधी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवारांना राजकीय वारसदार बनवून जात असल्याचे या बोलण्यातून दिसते," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.