बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 15:37 IST2017-09-05T15:36:16+5:302017-09-05T15:37:06+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.

बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!; भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप
नाशिक, दि. 5- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत लाडक्या विघ्नहर्त्याची ढोल ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गणरायाचे गंगाघाटावर नदीपात्रात विसर्जन करून भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघे कुटूंब एकवटले होते. लाडक्या गणरायाला निरोप देतांनाच पुढल्या वर्षी लवकर या असा नारा गणेश भक्तांनी दिला.
पंचवटी परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक मित्रमंडळाच्यावतीने गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सकाळी घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांनी गंगाघाटावरील गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगण, तपोवन, रामवाडी गोदापार्क परिसरात गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांनी ढोल ताशा तसेच डीजे साऊंड लावून मिरवणूक काढून विविध हिंदी, मराठी गाण्यांवर तर कोणी ढोल ताशांवर ठेका धरुन गुलालाची उधळण करून मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला. सकाळी घरात बाप्पांची आरती करण्यात येऊन बाप्पांच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून चढविण्यात आले.
गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत महिला भाविक, बालगोपाळ मोठया संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी तसेच पुरूषांनी डोक्यावर भगवे, लाल रंगाचे फेटे व टोप्या परिधान केल्या होत्या तर काही महिलांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. युवक वर्गाने कपाळावर गणपती बाप्पा मोरया असे लिहलेल्या पट्टया बांधलेल्या होत्या. विघ्नहर्त्याला कोणी खांद्यावर तर कोणी दुचाकी, चारचाकी वाहनातून विसर्जन करण्यासाठी नेत होते. गंगाघाटावर विघ्नहर्त्याला निरोप देतांना कुटूंबातील सर्व सदस्यांनी आरती करून बाप्पांना पुढल्या वर्षी लवकर येण्याची विनवणी केली.