Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:05 IST2025-11-18T13:04:05+5:302025-11-18T13:05:29+5:30
Eknath Shinde On Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.

Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरा रोड : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव ब्रँड आहेत. बाकी स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा जनता नक्कीच बँड वाजवेल व शेवटच्या स्टँडमध्ये पोहोचवेल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव व राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सोमवारी भाईंदरच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
भाईंदरच्या न्यू गोल्डन नेसलगत उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. यावेळी शिंदे म्हणाले की, "कलादालन पाहताना साक्षात बाळासाहेब समोर असल्याचा भास होतो. येथे जे कोणी येतील ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या तेजस्वी भाषणामुळे जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातील असे हे स्मारक आहे. सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे उल्लेखनीय काम झाले आहे. जनतेच्या विकासकामांसाठी सर्वात जास्त सह्या आणि निधी सरनाईक यांनीच माझ्याकडून घेतला. तर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकिर्दीत हजारो विकासकामे केली; परंतु शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन हे आतापर्यंतचे सर्वोच्च कार्य आहे. आपली नऊ वर्षांची तपश्चर्या आज पूर्ण झाली आहे."