हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:15 PM2020-03-27T13:15:52+5:302020-03-27T13:17:02+5:30

देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे.

Bajaj Group Commits ₹ 100 Crore To Fight COVID-19 vrd | हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं अवघा देश थबकला आहे. अनेकांना घरातच थांबून राहावं लागल्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या हालाला पारावार उरलेला नाही. गोरगरीब जनता आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावते आहे. विशेष म्हणजे गोरगरीब जनतेसाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळकट करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावले आहेत. देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे. बजाज ग्रुपनं आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी बजाज उद्योग समूह शक्य तितके प्रयत्न करणार आहे. बजाज समूहानं एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सगळं नमूद करण्यात आलं आहे. 
बजाज समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांनाही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना अन्नधान्य पुरवठा, गृहनिर्माण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांकडे पुरविण्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना विषाणूचा देशात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर लोक आपल्या गावी परतत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रकमेचा बहुतांश निधी हा ग्रामीण भागात खर्च केला जाणार आहे. कोरोनाविरोधातील या देशाच्या लढ्यात आम्ही १०० कोटी रुपयांचं योगदान देत आहोत. 200 एनजीओंसोबत आम्ही काम करत असून, शक्य तितक्या ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच गरजू लोकांपर्यंत आवश्यक संसाधने पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 


कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्याची आरोग्यसेवा आणि पायाभूत सेवा मजबूत करण्यावर आमचा भर राहील. १०० कोटींची ही रक्कम सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे इ. खरेदी करण्यासाठी वापरली जाईल.
या मदतीची रक्कम वेगळं युनिट तयार करण्यासाठी वापरणार असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ग्रामीण भागात एक मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटद्वारे बजाज कंपनीच्या घोषणेविषयी माहिती दिली. गरीब आणि गरजू कुटुंबीयांना कर्जाच्या स्वरूपात पैसे देऊन रोजगार सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यानंतर जेव्हा कर्जाची परतफेड करण्यात येईल, तेव्हा ते पैसे इतर कुटुंबांना दिले जातील. यामुळे बर्‍याच कुटुंबांना रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल. तसेच बजाज कंपनी कोरोनावर जनजागृती मोहीम राबविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून लोकांना या साथीच्या आजारापासून वाचवता येईल.

Web Title: Bajaj Group Commits ₹ 100 Crore To Fight COVID-19 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.