विधाने भोवणार? अक्षय शिंदेच्या वकिलांनी बजावली शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 23:22 IST2025-01-29T23:18:15+5:302025-01-29T23:22:09+5:30

Badlapur Case: कारण काय? वकिलांनी काय आरोप केले आहेत?

badlapur case akshay shinde lawyer serve notice to shinde group minister yogesh kadam and sanjay shirsat | विधाने भोवणार? अक्षय शिंदेच्या वकिलांनी बजावली शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना नोटीस

विधाने भोवणार? अक्षय शिंदेच्या वकिलांनी बजावली शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना नोटीस

Badlapur Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचे दंडाधिकारी चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. ठाणे क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे,  सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, मुख्य हवालदार अभिजित मोरे, हवालदार हरीश तावडे आणि पोलिस वाहनाचा चालक अशा पाच जणांच्या पथकावर दंडाधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे. यानंतर आता अक्षय शिंदेच्या वकिलांकडून शिवसेना शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

पोलिसांनी बनावट चकमकीत आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेद्वारे केला. याच्या  तपासासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. त्यावर, दंडाधिकारी चौकशी सुरू असल्याचे सरकारने न्यायालयाला सुरुवातीच्या सुनावणीत सांगितले होते. यानंतर दंडाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करण्यात आला. तो वाचल्यानंतर न्यायालयाने, पोलिसांकडून बळाचा वापर होणे न्याय्य नाही. पोलिस परिस्थिती सहजपणे हाताळू शकले असते, अशी टिप्पणी केली. त्यावर, राज्य सरकार कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हाही दाखल करेल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.  

अक्षय शिंदेच्या वकिलांकडून शिंदे गटाच्या २ मंत्र्यांना नोटीस

अक्षय शिंदेच्या वकिलांनी शिवसेना शिंदे गटाचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नेत्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना काही वक्तव्ये केली होती. या वक्तव्यावरुन त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच या दोघांनी न्यायालयाचा निर्णय लागण्याआधीच सुरू असलेल्या खटल्यावर प्रभाव टाकणारे वक्तव्य केल्याने या दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे.

योगेश कदम आणि संजय शिरसाट यांनी काय विधाने केली होती?

संजय शिरसाट यांनी अक्षय शिंदे हा नराधम होता आणि तो मेला हा जनतेला आवडलेला भाग होता असे वक्तव्य केले होते. तर, पोलिसांवर अक्षय शिंदेने फायरिंग केली, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तरात फायरिंग करावी लागली. अतिशय घृणास्पद कृत्य या व्यक्तीने केले. डिफेंसमध्ये जर पोलिसांनी असे कृत्य केले असेल तर यात गैर आहे असे वाटत नाही. एन्काउंटर झाले तेव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे गन पावडर सापडली नसावी. या गोष्टीसाठी वेळ मिळाला नसेल, असे योगेश कदम म्हणाले होते.
 

Web Title: badlapur case akshay shinde lawyer serve notice to shinde group minister yogesh kadam and sanjay shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.