६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:45 IST2025-08-04T14:44:01+5:302025-08-04T14:45:11+5:30
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात आंदोलन उभे केले आहे

६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
मुंबई - मराठीच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या आवाहनाला अनेक नेत्यांनी प्रतिसाद दिला. ना झेंडा फक्त मराठीच अजेंडा असा नारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी सातत्याने महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू येत्या ६ ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात आंदोलन उभे केले आहे. त्यात शेतकरी कर्जमाफीचा कळीचा मुद्दा आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं आश्वासन दिले होते परंतु सत्तेत येऊन १० महिने उलटले तरीही सरकारने अद्याप शेतकरी कर्जमाफी केली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर बच्चू कडू आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला होता. मनसे नेते बाळा नांदगावकर हे कडूंनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते.
तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढलेली आहे. सातबारा कोरा होण्यासह आणखीही काही त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. राज ठाकरे यांनी तात्काळ होणार दिला. राज ठाकरे मला म्हणाले की, केवळ पाठिंबा देऊ नको, तर तू स्वतः त्या ठिकाणी जा. बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की, त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत. कुठूनही पैसे आणा पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होते.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात त्यांनी शेतजमिनी विकू नका, उद्योगात मराठी माणसांना भागीदारी द्या असे मुद्दे मांडले होते. शेकाप पक्षाच्या दुसऱ्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर २ भगवे झेंडे आले आहेत असं विधान राज यांनी केले होते.