“शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:02 IST2023-11-27T12:59:23+5:302023-11-27T13:02:25+5:30
Bacchu Kadu Vs Chhagan Bhujbal: कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती रद्द करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

“शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा”; बच्चू कडू स्पष्टच बोलले
Bacchu Kadu Vs Chhagan Bhujbal: राज्यात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. यातच शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असे प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केली. यावरून आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या प्रकरणी आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
शिंदे समिती बरखास्त केली नाही तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा
नेत्यांनी हातपाय कापण्यापर्यंत हा संघर्ष नेऊ नये. हातपाय कापणे सोपेच आहे. त्याला ताकद लागत नाही. नेत्यांनी हातपाय जोडण्याचे काम केले पाहिजे. छगन भुजबळ म्हणजे सरकार नाहीत. भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे शिंदे समिती रद्द झाली नाही, तर त्यांनी राजीनामा द्यावा. एकतर ती समिती रद्द करा नाहीतर मग राजीनामा द्या, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. छगन भुजबळांनी इतके वर्षे राज्य केले. त्यांनी कापण्यापेक्षा जोडता कसे येईल, याचा विचार केला पाहिजे. ओबीसी नेते तायवाडे त्यांनाही माझा इशारा आहे की, तुम्ही हातपाय कापा आम्ही जोडण्याचे काम करू. तुमची बुद्धी इतक्या खालच्या पातळीवर गेली असेल तर मी त्याचा निषेध करतो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
दरम्यान, तुम्ही तुमचे आरक्षण शांततेने मागावे. ओबीसीमध्ये मराठा घुसतोय, असे काहीही नाही. कारण कोकणातला, विदर्भातला मराठा कुणबी झाला. पण चार-पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही. त्यासाठीच गाजावाजा होतोय. हे सगळे राजकीय श्रेय घेण्याचे काम आहे. ज्यांचे काहीच राहिले नाही, त्यांचे जातीच्या नावाने चांगभले आहे. ते आता नळावरच्या भांडणासारखे भांडायला लागले. याचे मला नवल वाटते, असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी मांडले.