मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:07 IST2025-07-10T06:06:51+5:302025-07-10T06:07:18+5:30

नातेवाइकांनी तत्काळ त्या बाळास डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले.  

Baby declared dead cries during funeral; Shocking incident at Ambajogai hospital | मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

अंबाजोगाई (जि. बीड) : कमी दिवसात, कमी वजनाचे जन्मलेले बाळ हालचाल करत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून नातेवाइकांकडे सुपूर्द केले. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते बाळ हालचाल करत रडू लागले. हा प्रकार मंगळवारी अंबाजोगाई उघडकीस आला.

केज तालुक्यातील होळ येथील महिला प्रसुतीसाठी सोमवारी रात्री येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली. रात्री महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र, हे मूल हालचाल करत नव्हते. बाळास डॉक्टरांनी मृत घोषित केले व ते बाळ नातेवाइकांकडे सोपवले. आता या बाळावर अंत्यसंस्कार करावे लागतील. याच्या प्रक्रियेत असतानाच अचानकच त्या बाळाची हालचाल सुरू झाली व ते बाळ रडू लागले. नातेवाइकांनी तत्काळ त्या बाळास डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले.  

कुशीत घेताच हालचाल
बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित करून नातेवाइकांकडे सोपवले. त्याला अंत्यसंस्कारासाठी होळ येथे नेले असता, एका वृद्ध महिलेने बाळाला उघडून पाहिले असता हालचाल दिसली.  त्यामुळे महिलेने त्याला कुशीत घेताच बाळ रडले आणि जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व प्रकाराचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

प्रसुतीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आले. त्याचे वजन केवळ ९०० ग्रॅम आहे. जन्मानंतर त्याची हालचाल नव्हती. त्यामुळे असा प्रकार घडला असावा.  - डॉ. गणेश तोडगे, स्त्रीरोग व प्रसुती विभागप्रमुख, अंबाजोगाई

विभागप्रमुखांकडून घटनेचा अहवाल तत्काळ मागवला आहे. चौकशीसाठी समिती नेमली आहे. दोषींवर कारवाई केली जाईल. - डॉ. राजेश कचरे, प्रभारी अधिष्ठाता, - स्वा. रा. ती. रुग्णालय, अंबाजोगाई

Web Title: Baby declared dead cries during funeral; Shocking incident at Ambajogai hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.