शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 09:05 AM2021-11-16T09:05:27+5:302021-11-16T09:05:53+5:30

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही.

Babasaheb purandare was struck by the mantra blown by Shivaji Raja | शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

शिवाजीराजांनी कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले बाबासाहेब

googlenewsNext
ठळक मुद्देमाणसे इतिहासातून खरोखरच घेतात का स्फूर्ती? पुनःपुन्हा शिवचरित्र वाचताना वाटते, महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्रही असाच मेल्या मनाचा नव्हता का?

त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुट्टीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावी म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्र्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काहीतरी अदभुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉईंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवारायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे. पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाही अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.
पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही तशी पुरंदरऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहाससंशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे, आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजीमहाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूट भरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट...शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहाससंशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायावरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते अशी यांची समजूत असावी. पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे असे मानायचे कारण नाही. दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे हे शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजीमहाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राईंगमास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग.ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे साहाय्यक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले. वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्त्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

शिवचरित्रावर पुरंदऱ्यांनी गेल्या चौदापंधरा वर्षीत दीड हजारांवर व्याख्याने दिली. एखाद्याचा विश्वास बसणार नाही, पण वऱ्हाडात खेड्यापाड्यातले लोक बैलगाड्या जोडून व्याख्यानासाठी येत. नागपुरात तर एकदा त्यांना एका दिवसात नऊ व्याख्याने द्यावी लागली होती. शिवाजीमहाराजांचे नाव घेऊन येणारा कुणीही ह्या माणसाला पळवून नेऊ शकतो. शिवचरित्राविषयी कुणीही कणभर उत्कंठा दाखवली तर हा माणूस मणभर बोलायला तयार होतो.
इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद्गार काढावे इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.
माणसे इतिहासातून खरोखरच घेतात का स्फूर्ती? पुनःपुन्हा शिवचरित्र वाचताना वाटते, महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्रही असाच मेल्या मनाचा नव्हता का? कसलेही भव्य स्वप्न नसलेले आमचे नेते, न शिवशिवणारी आमची मनगटे, शिव्यागाळीला संग्राम समजणारी आणि बुद्धीच सांगणारी विद्वान मंडळी, मुजोरीला स्वाभिमान आणि सौजन्याला भेकडपणा मानणारी, खाजगी वैरांना तत्त्वाच्या चौकटी शोधायची आमची वळवळ!

डोक्यात काहूर उठते. पुरंदऱ्यांच्या शिवचरित्रातच उत्तर शोधायला लागतो. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तराचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. रायाजीच्या वेड्या शिवांगीसारखा माक्कळातल्या फुलाफुलाला शिवरायाच्या नावाचा ठाव विचारला. दगडा-दगडाला गाव विचारला. काट्याकुट्यातून देहाची चाळण करून त्या शिवांगीचे वेड घेऊन हा तरुण शिवरायाच्या आठवणींमागून हिंडला. ही भाग्याची वेडे!

हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात. शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतूहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्र मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात!
निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिध्दीला असा एखादा मंत्र लागतो. पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे! पुरंदऱ्यांना हे भाग्य लाभले आहे. आणि पुरंदऱ्यांचा स्नेह मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. माझे भाग्य मोठे! पेढा करण्याचे कसब असण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची!

(पु. ल. देशपांडे यांच्या ‘गणगोत’ मधील लेखाचा संपादित भाग साभार...)

Web Title: Babasaheb purandare was struck by the mantra blown by Shivaji Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.