राजकारणाच्या अंगणापासून लेखक अलिप्तच.. पक्षांपासूनही दूरावाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:00 IST2019-04-02T06:00:00+5:302019-04-02T06:00:10+5:30
कोणत्याही राजकीय विचारधारेचा अंगिकार करून त्याचा उघडपणे प्रचार करणाऱ्या साहित्यिकांची संख्या हाताच बोटावर मोजण्याइतकीच आहे.

राजकारणाच्या अंगणापासून लेखक अलिप्तच.. पक्षांपासूनही दूरावाच...
राजू इनामदार
पुणे : राजकारणाच्या अंगणापासून बहुसंख्य मराठी साहित्यिकांनी स्वत:ला अलिप्तच ठेवले आहे. कोणत्याही राजकीय विचारधारेचा अंगिकार करून त्याचा उघडपणे प्रचार करणाऱ्या साहित्यिकांची संख्या हाताच बोटावर मोजण्याइतकीच आहे. समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या साहित्यिकांमध्ये हा टोकाचा अलिप्ततावाद का? याचालेखकांकडेच शोध घेतला असला त्याला प्रामुख्याने राजकारणाचा बदललेला पोतच कारणीभूत असल्याचे दिसते. सत्तेचा मद व पैशाचा माज या दोन्ही गोष्टी राजकारणाचा अविभाज्य भाग झाल्या असून त्यातूनच हे काम आपले नव्हेच या न्यूनगंडाने बहुसंख्य साहित्यिकांना पछाडले असल्याचे निदर्शनास येते आहे.
अनिल बर्वे हे एखाद्या राजकीय विचारधारेचे उघडपणे समर्थन करणारे मराठी साहित्यिकांमधले ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने बंदी घातलेल्या नक्षलवादाचे समर्थन त्यांनी केले. त्यावर आधारित थँक्यू मिस्टर ग्लाड, डोंगर म्हातारा झाला यासारख्या साहित्याची निर्मिती केली. मात्र अशा राजकीय विचारधारेचे समर्थन केल्याचा त्यांना बराच त्रास झाला. त्यामुळेच की काय, पण त्यानंतर कोणीही लेखक उघडपणे राजकारणात उतरलेला नाही. ग. दि. माडगूळकर काँग्रेस पक्षाचे काम करत, मात्र ते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेतल्यानंतर. ना. धो. महानोर यांनाही ती संधी मिळाली, मात्र ते कधीही काँग्रेसच्या व्यासपीठावर आले नाहीत. द. मा. मिरासदार यांनी मात्र संघप्रणित अभाविपचे काम केले. रामदास फुटाणे यांनीही काँग्रेसबरोबर असलेले सख्य लपवले नाही, मात्र आपल्या वात्रटिकांमधून त्यांनी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांवर प्रहार केले आहेत, तरीही थेट निवडणूकीच्या किंवा प्रचाराच्या फडात ते कधी उतरलेले नाहीत. अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच का? या प्रश्नावर फुटाणे म्हणतात,एकही मराठी साहित्यिक फक्त लेखन करून जगत नाही, जगू शकत नाही हेच त्याचे कारण! कुठेतरी नोकरी करून कसाबसा संसार रेटत असलेला लेखक राजकारणाच्या धबडग्यात पडेल तरी कसा व कशासाठी? संस्थाचालक राजकारणात असतील तर तो त्यांच्या प्रचारात त्यांनी दिलेले काम इमानइतबारे करणार व नंतर परत आपल्या विश्वात मग्न होणार! ते काम करताना दिसलेले विश्वच त्याच्यासाठी इतके भयंकर असते की त्यावरचा शब्दही कधी लेखनात येऊ नये याची काळजी तो घेतो, असा पापभिरू माणून राजकारणात येऊन करणार तरी काय?
लेखक राजकारणात का नाहीत यावर प्रतिक पुरी या ताज्या दमाच्या नव्या लेखकाचे मतही काहीसे वेगळे आहे. लेखक राजकारणात येत नाहीत, निवडणुकांमध्ये दिसत नाहीत हे त्यांना मान्य आहे, मात्र त्याची कारणे त्यांच्या लेखी वेगळी आहेत. लेखकांची मते बहुधा सत्ताधाºयांच्या विरोधात असतीत. ती जाहीरपणे व्यक्त करण्याच्या फंदात तो पडत नाही. साहित्यामधून ते ती व्यक्त करत असतातच. जाहीरपणे मात्र ते तटस्थ राहणे पसंत करतात. तसे केल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत असते. प्रत्यक्ष राजकारणात बºयाच तडजोडी कराव्या लागतात, मतांना मुरड घालावी लागते. हे लेखकांच्या स्वभावात बसत नसल्यामुळेच ते राजकारणात उतरत नसावेत असे पुरी यांना वाटते.
राजकारणावर कांदबरी लेखन करणारे विश्वास पाटील म्हणाले, राजकारणात विचारधारा राहिलेलीच नाही. सकाळी एक पक्ष व संध्याकाळी दुसरा पक्ष असे झाले आहे. लेखकाला संघर्ष करत जगावे लागते. हल्लीचे राजकारण पैशांचे झाले आहे. गरीबी हा लेखकाचा स्थायीभाव आहे. राजकारणासाठी तो पैसा आणणार कुठून? राजकीय पक्षांना नटनट्यांचे त्यातही हिंदी, मराठी नाहीच, महत्व वाटते, कारण त्यांना ग्लॅमरही असते व पैसाही असतो. लेखकांकडे या दोन्ही गोष्टी नाहीत व तो त्या कुठून आणूही शकत नाही. लेखक म्हणूनही त्याच्या प्रसिद्धीला मयार्दा असते. लेखकालाही हे माहिती असते. त्यामुळेच ह्यनको तो फंद आणि छंदही, बाजूला राहणेच चांगलेह्ण ही विचारधारा जोपासली जाते.
संघर्ष टिकवण्यासाठी लेखकांचा उपयोग
परराज्यात, विशेषत: कर्नाटक मध्ये लेखक राजकारणात दिसतात याचे कारण सांगताना विश्वास पाटील म्हणाले, कर्नाटक राज्य शेजारच्या प्रत्येक राज्याबरोबर संघर्ष करत असते. हा संघर्ष कधी पाण्यावरून असतो तर कधी सिमारेषेवरून. हा संघर्ष तेथील राजकारण्यांना टिकवायचा असतो. १७ मंत्र्यांपेक्षा १७ लेखक अस्मितेला चांगली फूंकर घालतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे संघर्ष फुलता ठेवण्यासाठी म्हणून ते लेखकांना राजकारणाच्या मंचावर घेतात, मात्र फार पुढे जाऊ देत नाहीत. पक्षाचे धोरण वेगळ्या साहित्यिक भाषेत मांडणे हेच त्यांचे काम असते व तेच ते करतात.