Sangli: देहत्यागाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न, दररोज वैद्यकीय तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:19 IST2025-08-27T16:18:56+5:302025-08-27T16:19:23+5:30
मानसोपचार तज्ज्ञांची धडपड सुरु

Sangli: देहत्यागाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबाचे मन वळविण्याचा प्रयत्न, दररोज वैद्यकीय तपासणी
अथणी : अनंतपूर (ता. अथणी) येथील तुकाराम पांडुरंग इरकर कुटुंबीयांनी आत्मिक ध्येय साध्य करण्यासाठी प्राणत्यागाचा निर्धार केल्याने प्रशासनाची पळापळ सुरु झाली आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी बेळगाव येथील जिल्हा मानसोपचार तज्ज्ञ व वैद्यकीय प्रयत्न केले, पण त्यांना अद्याप यश आले नाही. त्यांच्या प्रकृतीची वारंवार तपासणी करण्यात येत असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
सांगली जिल्ह्यातील माधवनगर आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर सहा वर्षांपासून इरकर कुटुंब भक्तिमार्गावर आहे. घरातील सोने-चांदी, जनावरे विकून ते कर्जमुक्त झाले असून चार एकर शेती मुलाला दिली आहे. ६ ते ८ सप्टेंबर या कालावधित परमात्मा त्यांना घेऊन जाणार, असा ठाम विश्वास हे कुटुंब व्यक्त करीत आहे. गेल्या आठ दिवसांपासून इरकर कुटुंबाच्या घरी भक्त व कुतूहलापोटी आलेल्या लोकांच्या रांगा लागल्या आहेत. घराजवळील रस्ताही झुडपांनी आच्छादला आहे. प्रशासनासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे.
आरोग्य अधिकारी व मानसोपचार तज्ज्ञ वारंवार भेट देऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेळगाव जिल्हा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उत्तम शेला यांच्या पथकाने भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी शिवराज हरोली, महानंदा दोडमणी व विशाल पुजारी यांनी वैद्यकीय तपासणी केली.
तुकाराम इरकर यांचा दावा आहे की, रामपाल महाराजांचा आत्मा प्रत्यक्ष त्यांच्या खुर्चीवर येऊन मार्गदर्शन करतो. त्यांच्या सांगण्यावरून घरातील दागदागिने शोधून विक्री करून त्यांनी कर्जफेड केली आहे. भक्तिमार्गातून परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासन सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी हलवावे लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातून त्यांच्या जेवणाच्या व आहाराच्या तपासणीची मागणी होत आहे.