जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:33 IST2025-08-02T13:32:28+5:302025-08-02T13:33:22+5:30
कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
पनवेल - विकत घेता येणारी माणसे अशी प्रतिमा आपली महाराष्ट्राबाहेर उभी करण्यात येत आहे. मराठी माणसं विकाऊ आहे असं सांगितले जाते त्याची लाज वाटते. महाराष्ट्रात आपण आपली भाषा विसरतोय, आपली तत्वे घालवतोय, जमिनी घालवतोय. स्वाभिमानी माणसे विकली गेली तर जिवंत प्रेते उरतात. देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही मोठे झाले पाहिजे, पण महाराष्ट्र विकून नाही. इतरांच्या आहारी जाऊन जमिनी देऊन टाकायच्या, बाहेरची माणसे येतायेत. जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका अशी कळकळीचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राज ठाकरे म्हणाले की, शेकापच्या व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा येतोय. पक्षाचा विचार न करता मराठीचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत तेव्हा राज्य सरकारचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल, शिकवता येईल याचा विचार करतोय. महाराष्ट्रात कामधंदा करायला जे येतायेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार करत नाही. महाराष्ट्रातला मराठी माणूस, भूमिपूत्र याचा विचारच राज्य सरकारला नाही. याचे भीषण वास्तव रायगड जिल्ह्यात आहे. रायगडातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्यात माहिती नाही. जमिनीचे व्यवहार करणारे आपलेच, कुंपनच शेत खातायेत. उद्योगधंदे इथे येतायेत आणि लोक बाहेरून आणले जातील. शेतकरी आणि कामगार दोन्ही उद्ध्वस्त होतोय. रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी हाती घेतली पाहिजे. इथला मराठी माणूस, इथला शेतकरी, उद्योगधंदे यावर मराठी माणसाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह स्वत: एका मुलाखतीत मी गुजराती आहे, हिंदी भाषिक नाही असं सांगतात. महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प आज गुजरातला जातायेत. प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते मग आम्ही संकुचित कसे? हिंदी गुजरातमध्ये सक्तीची नाही मग महाराष्ट्रात का? भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलेही स्थान नाही. गुजरातमध्ये कायद्यानुसार जे गुजराती नाहीत, अधिवासी भारतीयांना थेट शेत जमीन विकत घेता येत नाही. ज्या राज्याचे पंतप्रधान, गृहमंत्री गुजरातचे आहेत, तिथली शेतजमीन भारतातील कुठलाही नागरीक विकत घेऊ शकत नाही. जर जमीन विकत घ्यायची असेल तर एक विशिष्ट कायदा आहे त्यानुसार परवानगी घ्यावी लागते. आज आपल्याकडे कुणीही जमीन विकत घेतंय. आमचेच लोक जमिनी विकतायेत. यातून आपणच संपणार हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे?, रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. कल्याणच्या सूभेदाराची सून खणानारळाने ओटी भरणाऱ्या आपल्या राजा शिवछत्रपतींची राजधानी इथे आहे तिथे डान्सबार सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवतंय, हे नुसते गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. त्यातून मराठी माणूस आणि गुजराती माणसांमध्ये भांडण लावावी यासाठी केलेले हे उद्योग आहे. तुम्हाला हवे ते आम्ही करणार नाही परंतु ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळी अंगावर येऊ. कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जातायेत, पायाखालची जमीन निसटतेय. भाषा जातेय मग कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
जनसुरक्षा कायद्यावर राज ठाकरेंची टीका
यापुढे उद्योगधंद्यासाठी, जमिनीसाठी लोक आले तर जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत तर तुमच्या कंपन्यांमध्ये पार्टनर म्हणून घ्या असं सांगायचे. आपण या गोष्टी वाचवायला नाहीत तर यापुढे रायगडमध्ये अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील. अख्खा ठाणे जिल्ह्याला हा विळखा पडला आहे. सगळ्या पक्षांनी येऊन याचा विचार केला पाहिजे. नवी मुंबई विमानतळावर १०० टक्के मराठी मुले कामाला लागली पाहिजेत. बाहेरून येऊन जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसं थैमान घालणार हे चालणार नाही. आता सरकारने कायदा आणला आहे जो आंदोलन करेल तो अर्बन नक्षल...एखाद्या प्रकल्पाला तुम्ही विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. अटक करूनच पाहा, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांना त्यात सामावून घ्यावे लागेल असं सांगत राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्यावर टीकास्त्र सोडले.