Assembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:49 IST2019-10-23T15:48:53+5:302019-10-23T15:49:07+5:30
मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले.

Assembly Election 2019: निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष
- मोसीन शेख
मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे निवडणुकीच्या या धामधूमीत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला प्रचारानंतर आता एक्झिट पोल, ईव्हीएम, युती,आघाडी तसेच सरकार कुणाचे येणार याची चर्चा मोठ्याप्रमाणावर सूर आहे. माध्यमात सुद्धा सतत याच मुद्द्यावरून चर्चा केली जात आहे. तर राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत तर प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतली आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानिकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
मराठवाडा-कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने, खरिपिच्या काढणीस आलेल्या पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले. काढून ठेवलेली सोयाबीन,भात, कापूस,ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणी सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे.
पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरु असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. तर याच निवडणुकीच्या कामात प्रशासकीय अधिकरी गुंतले असल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुणीच पुढाकर घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करणे, शेतकऱ्यांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे.