कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:40 IST2025-09-05T05:40:10+5:302025-09-05T05:40:58+5:30
आंदोलनामधून कुणाला काय मिळाले? यापेक्षा टोलेबाजीच जास्त झाली. राजकारणात एकाला टोचले की दुसरा शांत बसेल, असे कधी झालेय का? त्यामुळे आता मनसेकडे लक्ष लागलेय.

कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
एकाला टोचले की दुसरा शांत बसेल?
मराठा आंदोलन संपले. समाजात जल्लोष पसरला आहे... आंदोलनाच्या त्या पाच दिवसांत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. त्यांचे ‘ते शिंदेंना विचारा!’ एवढेच वाक्य वादळ ठरले. आता राज बोलले म्हणजे वाद तर होणारच! शिंदेसेनेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आधी लोकांमधून निवडून या, मग काय ते भाष्य करा, असा त्यांना टोला लगावला. आंदोलनामधून कुणाला काय मिळाले? यापेक्षा टोलेबाजीच जास्त झाली. राजकारणात एकाला टोचले की दुसरा शांत बसेल, असे कधी झालेय का? त्यामुळे आता मनसेकडे लक्ष लागलेय.
खा. राऊतांचा रोख कुणाकडे?
पाच दिवस सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन मंगळवारी संपले. हजारो आंदोलक गावी पोहोचले. मात्र, आंदोलनाचा राजकीय धुरळा अद्याप मुंबईत तसाच आहे. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी बुधवारी आंदोलनावर तोडगा काढल्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघडपणे दिले. तर लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी त्यांनी वेगळाच सूर लावत सरकारमधील काहींची इच्छा होती की मनोज जरांगे यांनी माघार घेऊ नये. हा संघर्ष वाढावा व फडणवीस यांचे सरकार अडचणीत यावे, असे म्हटले. यामुळे खा. राऊत यांचा नेमका रोख कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य वाटायला नको.
अन् त्या म्हणाल्या, ‘ती मी नव्हेच...’
पुण्यात जुळ्यांचे संमेलन नुकतेच झाले आणि जुळ्यांचे किस्से ऐकून उपस्थितांनी हसून प्रतिसाद दिला. असाच एक किस्सा राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितला. मलाही जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे जुळ्यांसोबतचे आयुष्य किती मजेशीर आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले असते, हे मला चांगलेच माहीत आहे. माझी एक बहीण उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहे. तिला भेटायला येणाऱ्या कुणासमोर जर तिची जुळी बहीण समोर आली की त्यांना वाटते ह्याच न्यायमूर्ती आहेत. एकदा असेच, जुळ्या बहिणीला भेटल्यावर तो अदबीने वाकून ‘मॅम नमस्कार’, असं म्हणाला. त्यावर, ‘ती मी नव्हे, माझी जुळी बहीण न्यायमूर्ती आहे, तुम्ही ज्यांना शोधत आहात, त्या दुसऱ्या आहेत.’ तो माणूस गोंधळून गेला आणि त्याला कळलं की चुकीच्या व्यक्तीशी बोलतोय.
अजितदादांची झापाझापी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी, कुणाला, कुठे झापतील हे कुणी सांगू शकत नाही. पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन - उद्घाटन कार्यक्रम झाले. त्यावेळी सूचना देऊनही रस्ता रुंदीकरणात येणारे पोलिस ठाणे स्थलांतरीत न केल्याचा विषय त्यांनी काढला आणि भर कार्यक्रमात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांना सुनावले. ‘मला हे परत सांगायला लावू नका. आम्ही जी कामे सांगतो, ती सार्वजनिक कामे सांगतो. वैयक्तिक नाही,’ असे ते म्हणाले. तर करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनाही व्हिडीओ कॉलवर दरडावल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आता उद्या ते कुणावर ‘दादागिरी’ करतात, याचीच उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली नाही तरच नवल.
संवादयात्रेतील हे ‘अंतर’ का?
विधानसभा निवडणुकीनंतर संदीप नाईक गेले कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण, चर्चांच्या गुऱ्हाळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते बेलापूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी आवर्जून गेले. पण, ही ‘संवादयात्रा’ सुरू असताना सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देणे ते आवर्जून टाळत आहेत, हे विशेष. त्यामुळे या युवा नेत्याने ‘अंतर’ ठेवण्याचा घेतलेला निर्णय राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना खतपाणी घालणारा ठरला नसेल तर नवल!
अलविदा नव्हे, फिर मिलेंगे!
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे बास्टियन बांद्रा हे रेस्टॅारंट आहे. त्याला अलविदा म्हणत तिने अगोदर बास्टियन बांद्रा बंद केल्याची भावुक पोस्ट केली होती. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपादरम्यान तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा रंगल्याने नंतर तिने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये बास्टियन बंद होणार नसून, ते ‘अम्माकाई’ या नावाने सुरू करत असल्याचे स्पष्ट केले. बास्टियन जुहूमध्ये ‘बास्टियन बीच क्लब’ या नावाने सुरू करणार असल्याचेही म्हटले. यावरून नेटकरी मात्र तिची फिरकी घेत आहेत.