अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:34 IST2026-03-27T12:34:21+5:302026-03-27T12:34:21+5:30
हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित; कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर ब्लॉक आदी कामांवर मोठा खर्च करण्यात आला. हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. २०१८ मध्ये निधी वितरित होताना बी. राधाकृष्णन जिल्हाधिकारी, तर नितीन मुंडावरे पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी होते. या निधी वाटपावर संशय व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांनी वाचवले वैजेश्वर मंदिर
सिन्नर तालुक्यातील वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा भोंदू अशोक खरातचा अजब सल्ला ग्रामस्थांनी वेळेत फेटाळून लावत शहाणपण दाखवले. सुमारे ११३९ साली उभारलेले हे मंदिर धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. चार वर्षांपूर्वी मंदिरातील शिवलिंग क्षीण झाल्याचे कारण देत खरातने मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या भोंदू बाबाच्या ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयात फॉरेन्सिक टीमकडून सखोल तपासणी करण्यात आली. टीमने फिर्यादी महिलेला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती घेतली. तिच्या सांगण्यानुसार कार्यालयातील विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. जवळपास एक तास चाललेल्या या तपासादरम्यान पथकाने कार्यालयातील कपाट, टेबल, संगणक आणि इतर साहित्यावरील ठसे गोळा केले.
दरम्यान, खरात प्रकरण आता उघडकीस आले असले, तरी दोन महिन्यांपूर्वीच या प्रकरणाची माहिती आपल्याला होती, असा दावा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीयनि घेतल्याने खरात आता तुरुंगाबाहेर येणार नाही, असा दावा त्यांनी केला.
पीडितांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अहिल्यानगर : भोंदूबाबा अशोक खरात याने पीडित महिलांचे जे लैंगिक शोषण केले, त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तिघांवर कोपरगा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात दोघांना पोलिसांनी अटक केली.
राहुल शिंदे (रा. शिवाजी रोड, कोपरगाव), योगेश आढाव (५०, रा. मोहिनीराज, कोपरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संदीप गर्ने (रा. माजलगाव, जि. बीड) याचा शोध सुरू आहे. आरोपींनी सोशल मीडियावरील बीएमडब्लू ग्रुपवर हे व्हिडीओ व्हायरल केल्याचे तपासात समोर आले आहे.
'रूपाली चाकणकर प्रदेशाध्यक्षपद सोडून द्या'
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेल्या रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी अजित पवार गटातील आमदारांनी केली आहे.
चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर ती जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने त्यांचा राजीनामा लांबल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नावासाठीही पक्षात एकमत झाले नसल्याचे समजते.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादण्यान अजित पवार गटच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी संबंधित चर्चा झाली.